नोटाबंदीचा निर्णय जाहिर होऊन आता दीड महिना उलटला आहे. या दीड महिन्यांच्या काळात नवनवे नियम जाहिर झाले आहेत. त्यामुळे गोंधळलेली जनता या ना त्या कारणाने आपला राग व्यक्त करते आहे. अशातच रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरूपातील ५००० रुपयांहून अधिक रक्कम ३० डिसेंबरपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार असल्याचा आदेश जारी केला. ही रक्कम जमा करताना ती या पूर्वी का भरली गेली नाही? याचे स्पष्टीकरण देणेही बंधनकारक करण्यात आले होते. आता या स्पष्टीकरणाच्या रकान्यात एकाने असे काही उपहासात्मक उत्तर लिहिले आहे की ते उत्तर व्हायरल झाले नाही तर नवलच.

वाचा : नोटा भरण्यास उशीर झाला कारण…; योगेंद्र यादव यांचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल

जुन्या नोटांच्या स्वरूपातील ५००० रुपयांहून अधिक रक्कम आतापर्यंत का जमा केली नाही? असा प्रश्न विचारला आहे. यावर एकाने फारच गंमतीशीर उत्तर दिले आहे. ‘जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा नागरिक ३१डिसेंबर २०१६ पर्यंत कधीही बँकेत जमा करू शकतो असे मोदींनी ८ डिसेंबरलाच स्पष्ट केले होते. आणि आज २० डिसेंबर २०१६ आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे’ असे स्पष्टीकरण या व्यक्तीने लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.

नोटाबंदीच्या निर्णय जाहिर केल्यानंतर बँकेतून पैसे काढण्यावर तर मर्यादा लादल्याच पण त्याचबरोबर २ लाखांहूनही अधिक रक्कम बँकेत भरणा-यांवरही आयकर विभाग नजर ठेवून आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आली कुठून आणि उत्पन्नाचा स्त्रोत काय याचे स्पष्टीकरण देणे  खातेदाराला बंधनकारक असणार आहे. असे केल्याने भ्रष्टाचा-यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे सांगण्यात आले. तसेच जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी ५००० रुपायांपर्यंत जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा जमा करता येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ही रक्कम जमा करण्यात दिरंगाई का करण्यात आली असेही विचारण्यात आले. या अजब फर्मानावर या नागरिकांने सडेतोड आणि नेमके उत्तर दिले आहे. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपवर त्याचे फोटो व्हायरल होत आहे.

वाचा : मुलगा गुगलमध्ये इंजिनिअर, तर वडील गावात करतात मोलमजुरी