Acharya Chanakya’s Powerful Advice on Money Health and Relationships : आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती ग्रंथात जीवनाच्या प्रत्येक पैलूवर भाष्य केले आहे. त्यांनी राजकीय आणि आर्थिक पैलूंवर, तसेच मानवी मूल्यांवरही शिकवण दिली आहे. त्यांची शिकवण त्यांच्या काळात जितकी समर्पक होती, तितकीच ती आजही आहे. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार काही विशिष्ट गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण भाग्यवान असतो असे मानले जाते. तर त्याचबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत…
भाग्यवान लोकांकडे पुढच्या ३ गोष्टी असतात
चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायात, आचार्य चाणक्य यांनी भाग्यवान लोकांकडे असलेल्या तीन गोष्टींचे वर्णन केले आहे. या गोष्टी जवळ असण्याने जीवन सुखी होते असेही त्यांचे म्हणणे आहे.
भोज्यं भोजनशक्तिश्च रतिशक्तिर वरांगना।
विभवो दानशक्तिश्च नाऽल्पस्य तपसः फलम्॥
म्हणजे…
१. उत्तम आरोग्य – ज्या व्यक्तीकडे नेहमी पुरेसे अन्न आणि ते अन्न पचवण्याची क्षमता असते, ती व्यक्ती भाग्यवान मानली जाते. आचार्य चाणक्यांनुसार, केवळ अन्नच नव्हे, तर चांगली पचनशक्ती हेदेखील भाग्यवान असण्याचे लक्षण आहे.
२. चांगला जोडीदार – “असा जोडीदार मिळायला नशीब लागतं” असं आपण सहज म्हणून जातो. म्हणून चांगला जोडीदार मिळणे हेदेखील भाग्यवान असल्याचे चिन्ह आहे. चाणक्यांनुसार, चांगला जीवनसाथी मिळाल्याने आपण आनंदी राहतो, सद्गुणी पत्नी मिळाल्याने माणसाचे नशीब उजळते.
३. दान – जर तुमच्याकडे पुरेशी संपत्ती असेल आणि तुम्ही तिचा उपयोग गरजू लोकांना मदत करण्यासाठी करत असाल किंवा ती दान करण्याची इच्छा बाळगत असाल, तर चाणक्य याला भाग्यवान लक्षण मानतात. चाणक्यांचा विश्वास आहे की, व्यक्तीसाठी पुरेशी संपत्ती दान करणे आवश्यक आहे. कारण – असे केल्याने समाजात आर्थिक संतुलन राखले जाते.
आचार्य चाणक्यांनुसार, या गोष्टी मिळणे हे केवळ तपश्चर्येचे फळ नसून, मागील जन्मातील कर्मांचे फळ असते. ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांना भाग्यवान म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आजही प्रत्येकाला पुरेशी संपत्ती, चांगला जीवनसाथी आणि उत्तम आरोग्य हवे असते. त्यामुळे, जर एखाद्या व्यक्तीकडे या सर्व गोष्टी असतील, तर तो नशीबवान किंवा भाग्यवान म्हंटला जातो.
