Chanakya Niti For Success In Life : आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथातून जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक सल्ले दिले आहेत. त्यात त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे हेही सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केल्यास, कोणालाही यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
आपल्याला सर्व काही माहीत आहे, असे मानणाऱ्यांसाठी आचार्य चाणक्यांनी एक विशेष धडा दिला आहे. असे लोक अनेकदा अहंकारी बनतात आणि त्यामुळे ते इतरांना कमी लेखण्याची एकही संधी सोडत नाहीत. मला सर्व काही येतं, असं समजणाऱ्यांसाठी चाणक्यांनी कोणता धडा दिला आहे ते आपण जाणून घेऊया…
अहंकार हा सर्वांत मोठा शत्रू
चाणक्यांच्या मते, अहंकार हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती अहंकारी असते, तेव्हा ती योग्य-अयोग्य विसरते. अशा लोकांमध्ये शिकण्याची इच्छा नसते; उलट त्यांना वाटते की, आपल्याला सर्व काही माहीत आहे आणि ते आपले ज्ञान इतरांवर लादतात. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबू देऊ नका. शहाणा माणूस तोच असतो, जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिकण्याचा प्रयत्न करतो. शिकण्यामुळे अहंकार वाढत नाही म्हणून आजपासूनच हे तत्त्व आपल्या जीवनात अंगीकारा.
दोषांकडे दुर्लक्ष करणे
चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती आपल्यातील उणिवांकडे पाहणे सोडून देते आणि स्वतःला शहाणी समजून नवीन आव्हाने स्वीकारण्यास नकार देते, तिच्या यशाचा मार्ग लवकरच बंद होतो. अशा व्यक्ती स्वतःच्या अपयशाचा मार्ग मोकळा करतात. म्हणून आपल्या उणिवा ओळखून, त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. जे लोक असे मानतात की, इतरांना काहीच माहीत नसते, ते स्वतःच मूर्ख असतात.
नम्रता स्वीकारा
चाणक्य म्हणतात की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नम्रता अंगीकारा. एक शहाणा आणि ज्ञानी माणूस नेहमी इतरांपुढे नम्रतेने वागतो. कारण- ज्ञान नम्रता शिकवते; अहंकार नाही.
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
