Chanakya Niti Stress Relief Tips: आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, नात्यांमधील गैरसमज, भविष्याची चिंता आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षा यांमुळे अनेकदा मन अस्वस्थ होतं. कधी भूतकाळातील चुकांचा पश्चात्ताप सतावतो, तर कधी भविष्यात काय होईल, या विचाराने वर्तमानातील आनंदही हरवून जातो. अशा परिस्थितीत छोट्या-छोट्या गोष्टींचाही ताण येऊ लागतो आणि मानसिक शांतता बिघडते. मात्र, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तर अनेक समस्यांचा सामना करणं सोपं होऊ शकतं.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतींमधून जीवनात विवेक, संयम आणि योग्य निर्णयांचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेतल्यास दैनंदिन जीवनातील ताण कमी करण्यासाठी आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत होऊ शकते. तर मग जाणून घेऊया छोट्या-छोट्या गोष्टींची चिंता कमी करण्यासाठी कोणत्या ४ गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात…
१. भूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्याची चिंता सोडा
अनेक जण भूतकाळात झालेल्या चुकांचा वारंवार विचार करत राहतात. एखादा चुकीचा निर्णय, हातातून गेलेली संधी किंवा नात्यात घडलेली एखादी घटना मनात घर करून बसते. दुसरीकडे, काही जण भविष्यात काय होईल, या विचाराने सतत चिंतेत असतात. मात्र, भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यावरही आपलं पूर्ण नियंत्रण नसतं. त्यामुळे जे घडून गेलं त्याचा सतत विचार करण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे, भविष्यातील अनिश्चिततेची भीती बाळगण्याऐवजी आजच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कालच्या चुकांमधून शिकणं आणि आज योग्य पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीचा आधीच विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा वर्तमानात जगायला शिका.
२. संगत निवडताना सावध राहा; चुकीची संगत वाढवू शकते मनाचा ताण
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा आपल्या विचारांवर आणि वागण्यावर परिणाम होत असतो. सतत नकारात्मक बोलणारे, इतरांमध्ये दोष शोधणारे किंवा प्रत्येक परिस्थितीत निराशाच व्यक्त करणारे लोक आपल्या मनावरही नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. याउलट, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे, मेहनती आणि प्रामाणिक लोक कठीण परिस्थितीतही आपल्याला धीर देतात. त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याची आणि समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळू शकते.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीतही संगतीला महत्त्व दिलं आहे. त्यामुळे कोणासोबत वेळ घालवायचा, कोणाच्या सल्ल्याला महत्त्व द्यायचं आणि कोणापासून योग्य अंतर ठेवायचं, याचा विचार करा. प्रत्येक व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या सहवासाची निवड विचारपूर्वक करणं अधिक महत्त्वाचं आहे.
३. प्रत्येकाला आपल्या खासगी गोष्टी सांगण्याची चूक करू नका
अनेकदा भावनेच्या भरात आपण आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगून टाकतो. मात्र, प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना समजून घेईल किंवा आपल्या खासगी माहितीचा योग्य वापर करेलच, असं नाही. त्यामुळे काही गोष्टी कोणासोबत आणि कितपत शेअर करायच्या, हे ठरवणं आवश्यक आहे.
कुटुंबातील खासगी समस्या, आर्थिक परिस्थिती, स्वतःच्या कमकुवत बाजू आणि भविष्यातील महत्त्वाच्या योजना याबाबत बोलताना विचारपूर्वक निर्णय घ्या. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिचं वागणं आणि तुमच्याशी असलेलं नातं समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ प्रत्येकावर संशय घ्यावा, असा नाही. उलट, विश्वासू व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोलणंही गरजेचं असतं. मात्र, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही. योग्य व्यक्तीशी योग्य वेळी बोलणं आणि स्वतःच्या खासगी आयुष्याच्या मर्यादा जपणं, यामुळे अनावश्यक गैरसमज टाळता येऊ शकतात.
४. मनावर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवा; छोट्या गोष्टींचा ताण होईल कमी
राग, मत्सर, लोभ आणि इतरांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा यांमुळे मनाची शांतता बिघडू शकते. एखादी गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडली नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीने आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणूक दिली नाही, तर आपण अस्वस्थ होतो.
अशा वेळी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहणं फायदेशीर ठरू शकतं. रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. त्याचप्रमाणे, सतत दुसऱ्यांशी स्वतःची तुलना केल्याने असमाधान वाढू शकतं.
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, हे स्वीकारायला शिका. स्वतःच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा, अपेक्षा वास्तववादी ठेवा आणि गरज पडल्यास काही गोष्टी सोडून देण्याची तयारी ठेवा.
