Chanakya Niti : हल्ली सोशल मीडियाच्या जगात लोक दिखाव्यासाठी महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, लक्झरी ट्रिप व महागड्या गॅजेट्सवर भरमसाट खर्च करतात. कधी कधी लोक केवळ इतरांना प्रभावित करण्यासाठी आपल्या कमाईपेक्षा जास्त पैसा खर्च करतात. बाहेरून सर्व काही छान दिसत असले तरी अनेक लोक कर्ज, तणाव आणि आर्थिक समस्यांशी सामना करत असतात. विशेष म्हणजे आचार्य चाणक्यांनी शतकांपूर्वीच अशा गोष्टींपासून लोकांना दूर राहण्याचा सल्ला दिला होता. चाणक्य नीतीनुसार, संपत्ती ही केवळ एक चैनीची वस्तू नसून कठीण काळात एक महत्त्वाचा आधार आहे. आचार्य चाणक्यांच्या मते, माणसाने आपली संपत्ती नेहमी जपून वापरी पाहिजे. कारण- संकटाच्या काळात ती सर्वांत जास्त उपयोगी पडते.
दिखाव्याची सवय
चाणक्य नीतीनुसार, जे लोक केवळ दिखावा करण्यासाठी आणि इतरांना प्रभावित करण्यासाठी पैसे खर्च करतात, ते जास्त काळ आनंदी राहू शकत नाहीत. अशा व्यक्ती हळूहळू आर्थिक अडचणी आणि कर्जात अडकू शकतात. चाणक्यांचा असा विश्वास होता की, पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते जपून ठेवणे आणि शहाणपणाने खर्च करणेही महत्त्वाचे आहे. जे लोक आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब ठेवतात, तेच लोक पैसा जपून वापरण्यात हुशार असतात. विचार न करता, खर्च केल्याने माणूस दुर्बळ होतो.
संकटकाळी कोण येतं मदतीला
चाणक्य नीतीनुसार, आयुष्य नेहमी सारखे नसते. चांगले व वाईट दिवस येतात आणि जातात. अशा वेळी वाचवलेला पैसा माणसाचा सर्वांत मोठा आधार बनतो. म्हणूनच चाणक्य नेहमी भविष्याचा विचार करून पैसे वाचवण्याचा सल्ला देत असतात. चाणक्य नीती हेदेखील स्पष्ट करते की, कोणत्या परिस्थितीत पैशाला महत्त्व देऊ नये. त्यांच्या मते, जेव्हा आत्मसन्मान आणि जीवनमूल्यांचा प्रश्न येतो, तेव्हा पैशाचे महत्त्व कमी लेखले पाहिजे. याचा अर्थ असा की, संकटाच्या वेळी पैसा महत्त्वाचा असतो आणि संरक्षण देतो; परंतु आत्मसन्मान आणि तत्त्वांसाठी त्याचा त्यागही केला जाऊ शकतो.
आजच्या जगात सोशल मीडियावर दिखाऊपणा आणि महागड्या जीवनशैलीचा दबाव सतत वाढत आहे, तिथे लोकांना चाणक्याचे शब्द खूपच जवळचे वाटतात. कदाचित त्यामुळेच चाणक्य नीतीशी संबंधित व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
