Acharya Chanakya On Good People : आचार्य चाणक्य भारतीय इतिहासातील एक महान रणनीतीकार, अर्थशास्त्रज्ञ आणि थोर विचारवंत मानले जातात. त्यांनी लिहिलेल्या नीती ग्रंथात कोणत्याही व्यक्तीला कसे ओळखावे याबद्दल स्पष्ट लिहिले आहे. चाणक्यांनी सुचवलेल्या पद्धतींनी तुम्ही एखाद्या व्यक्तीला पारखल्यास, आयुष्यात तुमची कधीही फसवणूक होणार नाही. चला त्याचबद्दल अधिक जाणून घेऊया.
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणं छेदनतापताडनैः।
तथा चतुर्भिः पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा॥
नीती ग्रंथातील हा श्लोक एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या चारित्र्याला कसे पारखावे याबद्दलचे मत स्पष्ट करतो. आचार्य चाणक्यांनुसार, ज्याप्रमाणे सोन्याची पारख चार प्रकारे केली जाते. घासणे, कापणे, तापवणे आणि ठोकणे, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती खरोखर चांगली आहे की नाही, हे तिच्या चार गुणांवरून ओळखता येते – त्याग करण्याची वृत्ती, उत्तम आचरण, सद्गुण आणि चांगले कर्म. चला तर याचबद्दल सविस्तर अभ्यास करूयात…
त्याग – जी व्यक्ती इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा किंवा स्वार्थाचा त्याग करू शकते, ती खरी आणि विश्वास ठेवण्याजोगी व्यक्ती असते.
सद्गुण – ज्या मंडळींचे चरित्र चांगले असते आणि जे इतरांविषयी मनात कटुता बाळगत नाही, त्याच्यावर विश्वास आपण ठेवू शकतो.
उत्तम गुण – व्यक्तीचे ज्ञान, समज, सहनशीलता हे त्याचे खरे गुण असतात, जे केवळ संकटाच्या वेळीच दिसून येतात.
कर्म, कृती – व्यक्तीचे हेतू त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसतात. जे लोक अधार्मिक मार्गाने पैसा कमावतात किंवा दुष्कृत्ये करतात, त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवावे.
संगत म्हणजे काय?
दर्शनध्यानसंस्पर्शेर्मत्सी कूर्मी च पक्षिणी।
शिशुं पालयते नित्यं तथा सज्जनसंगतिः ।।
चाणक्य नीतीमधील हा श्लोक चांगल्या संगतीचे (सज्जनांच्या संगतीचे) आणि लाभाचे परिणाम दर्शवतो. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जसे मासे आपल्या पिलांची केवळ नजरेने काळजी, कासव मनातून त्यांचे रक्षण आणि मादी पक्षी स्पर्शाने संगोपन करते, त्याचप्रमाणे सज्जन आणि चांगल्या लोकांची संगत माणसाला योग्य मार्ग दाखवते, त्याचे व्यक्तिमत्त्व घडवते आणि जीवनात पुढे जाण्यास मदत करते.
ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांचे संगोपन करते, त्याचप्रमाणे चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने माणसाचे सद्गुण आपोआप विकसित होतात. चांगली संगत माणसाला वाईटापासून वाचवते आणि त्याला योग्य मार्गावर नेते. म्हणून, जर तुम्हाला जीवनात यश हवे असेल, तर तुमच्या संगतीबद्दल विशेष जागरूक रहा.
