African Boy Speech Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. त्यांचे विचार, शौर्यगाथा आणि न्यायदान आजही आपल्याला प्रेरणा देतात. पण महाराजांचे हे विचार फक्त महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफ्रिका खंडातील युगांडा येथील एका शाळेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून महाराष्ट्रातील प्रत्येकाची छाती गर्वाने फुगली आहे.
अफ्रिकेतील चिमुकल्याने केले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण
सातासमुद्रापार अफ्रिका खंडातील युगांडा येथील एका छोट्याशा शाळेतील एक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषण करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये भाषण करत असला तरी त्याच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्याला वाटत असलेला अभिमान आणि आदर स्पष्टपणे जाणवतो.
मराठी तरुणांनी राबविला कौतुकास्पद उपक्रम
छत्रपती महाराजांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मराठी तरुणांनी हा उपक्रम राबविला असून त्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देत, वह्यांचे वाटप करून केले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेअर केला व्हिडीओ
व्हिडीओ सध्या अनेक सोशल मीडियावर फ्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनाही व्हिडीओ प्रचंड आवडला असून परदेशात महाराजांचा जयघोष मनाला स्पर्शून जातो अशी भावना त्यांनी आपल्या एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली. तसेच हा अभिनव उपक्रम राबवणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.
जगाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवारायांचे विचार
व्हिडीओमुळे हे दिसून येते की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर ते जगभरातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. परदेशातील एका निरागस चिमुकल्याच्या तोंडून सातासमुद्रापार दुमदुमलेला शिवरायांचा जयघोष ऐकणे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचवणारी बाब आहे. मराठी तरुणांच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि त्या चिमुकल्याच्या सुंदर भाषणाचे सध्या संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.
