Viral LinkedIn Post : बंगळुरू येथील प्रशांत हरिदास हा तीन वर्ष बेरोजगार राहिला, खूप शोधूनही त्याला नोकरी मिळली नाही. अखेर त्याने नोकरीच्या शोधाला श्रद्धांजली देणारी एक भावनिक पोस्ट लिंक्डइनवर लिहिली आहे. नोकरीसाठी राबवण्यात येणार्या निवड प्रक्रियेदरम्यान दुर्लक्षित राहिलेल्या आणि धीर खचलेल्या या तरुणाने त्याचा संताप आणि इतक्या वर्षांची खदखद या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. या लिंक्डइनवर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
या व्यक्तीने केलेल्या पोस्टमध्ये त्याने दुर्लक्ष करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्याने लिहिलं आहे की, “लिंक्डइन, सर्व गोष्टींसाठी आभार. इंडस्ट्री लिडर्स मला प्रतिसाद न दिल्याबद्दल आणि दुर्लक्ष केल्याबद्दल तुमचे आभार. स्वत:ला तयार करण्यासाठी मला पैसे खर्च लावले जेणेकरून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकाल, त्यासाठी धन्यवाद,” असं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टबरोबरच त्याने स्वत:चा ‘रेस्ट इन पीस’ लिहिलेला एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
वाचणाऱ्यांनी याचा कोणताही चुकीचा अर्थ लावू नये म्हणून हरिदास याने स्पष्टीकरण देखील दिले आहे. “पी.एस. : मी जीव देणार नाही. माझ्याकडे करायला अनेक गोष्टी आहेत, चव घेण्यासाठी पाककृती आहेत आणि भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. फक्त नोकरी मिळवणे, गोष्टी सुरळीत करणे आणि माझ्या प्रेमाबरोबर राहण्याचा प्रयत्न करणे याचा मृत्यू झाला आहे. जवळपास ३ वर्षे बेरोजगार आणि एकटे राहणे खूप कठीण आहे,” असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान या पोस्टने लिंक्डइनवर हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक या व्यक्तीबद्दल चिंता आणि सहानुभूती व्यक्त करत आहेत. तर याबरोबरच काही जण मात्र या पोस्टवरून टीका करताना आणि वेगवेगळे सल्ले देताना पाहायला मिळत आहेत. काही जणांनी हरिदास याला मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर एका वापरकर्त्याने नोकरी शोधण्यासाठी अधिक प्रोफेशनल मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान या पोस्टमुळे लिंक्डइनच्या बदलत्या वापराबद्दल देखील चर्चा सुरू झाली आहे. कधीकाळी हा प्लॅटफॉर्म फक्त प्रोफेशनल अपडेट्स आणि नेटवर्कींगसाठी वापरला जात असे, पण सध्या लोकांना नोकरी शोधताना तसेच कामासंबंधी येणाऱ्या वैयक्तिक अडचणी देखील येथे मांडल्या जात आहेत.