Influencers misuse Air India crash Victim Photo: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरूवारी (१२ जून) एअर इंडियाच्या विमानाने लंडनसाठी उड्डाण घेतले. मात्र अवघ्या ९ सेकंदात विमान कोसळले. यात २४१ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर विमान जिथे कोसळले तेथील ३० हून अधिक जणांचा बळी गेला. या अपघातात २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंबिय या दुःखातून अजून सावरलेले नाहीत. अशातच या शोकांतिकेचा गैरवापर काही इन्फ्लुएन्सर करत असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.
एअर इंडिया अपघातानंतर ‘शेवटचा सेल्फी’ व्हायरल झाला. डॉ. कोमी व्यास, पती प्रतीक जोशी आणि त्यांच्या तीन मुलांचा शेवटचा सेल्फी इंटरनेटवर व्हायरल होताच, अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. संपूर्ण जोशी कुटुंब अपघातात गेल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. आता डॉ. कोमी व्यास यांचे चुलत भाऊ कुलदीप भट यांनी या फोटोचा गैरवापर होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांनी काही इन्फ्लुएन्सर्सचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली.
भट यांनी आरोप केला की, इन्फ्लुएन्सर स्वतःचे लाइक्स आणि व्ह्यूज वाढविण्यासाठी चुकीची माहिती पसरवत आहेत. एडिटेड फोटो, मृतांचे खोटे व्हिडीओ वापरून स्वतःच्या व्हिडीओंना व्ह्यूज वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. भट म्हणाले, माझे आणि इतर २७० मृतांचे कुटुंबिय सध्या मानसिक धक्क्यात आहेत. आमच्या दुःखाचा वापर इन्फ्लुएन्सर स्वतःच्या लाभासाठी करत आहेत.
भट यांनी पुढे म्हटले की, माझी बहीण डॉ. कोमी यांनी विमानात बसल्यानंतर कुटुंबाचा एक सेल्फी घेतला आणि आमच्या कौटुंबिक ग्रुपवर शेअर केला. तो फोटो नंतर व्हायरल झाला. काही लोक त्या फोटोवरून व्हिडीओ तयार करत आहेत. असाच एक एआय जनरेटेड व्हिडीओ संबंध देशभरात व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर डॉ. कोमी यांची मोठ्या मुलीबाबतही गैरसमज पसरवले जात आहेत. तिच्या डीएनए चाचणीने नमुने अजून जुळलेले नाहीत. तरीही तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
डॉ. कोमी यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाऊंट्स तयार केल्यामुळेही कुटुंबाचा त्रास वाढला असल्याचे भट यांनी सांगितले. मी सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना विनंती करतो की, कृपया हे थांबवा. तुमचे लाइक्स, व्ह्यूज, फॉलोअर्स वाढविण्यासाठी तुम्ही आम्हाला मानसिक त्रास का देत आहात? असा संतप्त सवाल भट यांनी उपस्थित केला.
गुरुवारी (दि. १२ जून) एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाचा अपघात होऊन विमानातील २४२ पैकी २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनसाठी निघालेले विमान काही अंतरावर असलेल्या मेघानी नगर भागात कोसळले. या अपघातामध्ये डॉ. कोमी व्यास, पती प्रतीक जोशी, मुलगी मिराया आणि प्रद्युत आणि नकुल ही जुळी मुले मरण पावली.