सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे सरपटणारे अनेक प्राणी जंगलातून बाहेर मानवी वस्तीत शिरताना पाहायला मिळतात. विशेषत: या दिवसांत अनेक प्रकारचे साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. कधी नदी, नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते घरात, मैदान परिसरात शिरतात आणि लपून बसतात. अशाने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मात्र, या प्राण्याला आता मानवी वस्तीपासूनच धोका निर्माण झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका किंग कोब्राच्या तोंडात औषधाची प्लास्टिकची बाटली अडकलेली दिसत आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. सापाच्या तोंडात अडकली प्लास्टिकची बाटली व्हायरल व्हिडीओत एका किंग कोब्राच्या तोंडात प्लास्टिकची बाटली अडकल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ ओडिशामधील भुवनेश्वर परिसरातील कुठला तरी असल्याचे सांगितले जात आहे. हा किंग कोब्रा साप पावसामुळे मानवी वस्तीत शिरला आणि अन्न समजून त्याने रस्त्यावर पडलेली औषधाची प्लास्टिकची बाटली गिळण्याचा प्रयत्न केला. पण, ती बाटली त्याच्या तोंडात अडकली आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. दरम्यान, स्नेक हेल्पलाइनच्या लोकांनी या कोब्राचा जीव वाचवला आहे. लोकांच्या मदतीने वाचला कोब्राचा जीव व्हिडीओमध्ये सापाच्या तोंडात कफ सिरपची प्लास्टिकची बाटली अडकल्याचे दिसत आहे. सापानो गिळलेली बाटली बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला; पण तो त्यात यशस्वी होऊ न शकल्याने त्याची प्रकृती बिघडली. यावेळी तो मेल्यासारखा जमिनीवर पडून होता; पण काही धाडसी लोकांनी पुढे होऊन त्याला मदत केली. सुशांत नंदा यांच्या म्हणण्यानुसार, स्नेक हेल्पलाइनच्या लोकांनी खूप मोठा धोका पत्करला. त्यांनी सापाचा जबडा खालच्या बाजूने हळूहळू रुंद करून, ती प्लास्टिकची बाटली बाहेर काढली आणि त्याचा जीव वाचवला. कोब्राचे प्राण वाचविल्याबद्दल आयएफएस अधिकाऱ्याने स्नेक हेल्पलाइनच्या लोकांचे कौतुक केले. कोब्राच्या तोंडातून बाटली बाहेर पडताच तो पळून जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या बचावकार्यात मिळालेल्या यशानंतर लोकांनी ‘हर हर महादेव’चा नारा दिला. IFS अधिकाऱ्याने केले कौतुक IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी लिहिले, "भुवनेश्वरमध्ये एका कोब्राने कफ सिरपची बाटली गिळली आणि ती बाहेर काढण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. मोठी जोखीम पत्करून, स्नेक हेल्पलाइनच्या स्वयंसेवकांनी त्याचा जबडा खालच्या बाजूने हळुवारपणे रुंद करून ती बाटली काढली. त्यामुळे कोब्रासारख्या मौल्यवान सापाचा जीव वाचला. माणसांच्या चुका अन् प्राण्यांना शिक्षा!, युजर्सच्या कमेंट्स सापाचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "म्हणून विशेषत: संरक्षित भागात आणि आसपासच्या परिसरात कचरा न टाकण्यासाठी कठोर नियम तयार केले पाहिजेत." दुसऱ्या युजरने लिहिले, "मूर्ख मानवी वर्तनामुळे आपल्या वन्यजीवांना काय त्रास होत आहे हे पाहून वाईट वाटले." त्याच वेळी आणखी एका युजरने लिहिले की, आता हे काय, कोब्रालाही ड्रग्जचे व्यसन लागले आहे. तर इतर अनेक एक्स युजर्सनी कोब्राला वाचविणाऱ्या टीमचे कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.