Viral Video: इंदूर हे स्मार्ट सिटीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. जानेवारीमध्ये पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात मध्य प्रदेशातील इंदूरला सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून स्थान देण्यात आलं. सार्वजनिक-खासगी सहभाग मॉडेलद्वारे कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट लावणं यामुळे शहराला हा प्रतिष्ठिेचा पुरस्कार मिळाला आहे. अलीकडेच महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या बघण्यात हा इंदूरच्या स्वच्छतेचं दर्शन घडविणारा एक व्हिडीओ आला. एका ब्लॉगरच्या या व्हिडीओनं त्यांना प्रभावित केलं आहे. काय आहे या व्हिडीओत खास चला पाहू.

व्हिडीओमध्ये यूएस ट्रॅव्हल व्लॉगर मॅक्स मॅकफार्लिनने इंदूरमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयाची एक झलक व्हिडीओत दाखवली आहे आणि स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या सोप्या उपायांना अधोरेखित केलं आहे. ब्लॉगर मिस्टर मॅकफार्लिन यांनी नमूद केलं की, ग्राहकांना दिलेल्या स्टीलच्या प्लेट्स वेगळ्या डब्यात कशा ठेवल्या जातात, लोकांना त्यांचे हात धुण्यासाठी एक लहान बेसिन. तसेच खास गोष्ट अशी की, एखाद्या व्यक्तीनं रस्त्यावर चुकून अन्न सांडलं, तर ते लगेच कसं उचललं जातं हे लक्षात घेऊन त्यांनी स्थानिकांचं कौतुक केलं आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: ट्रॅफिकदरम्यान होणारी भांडणं, हाणामारी कसं टाळाल ? वाहतूक पोलिसांनी सांगितल्या ‘या’ आठ सोप्या ट्रिक्स

व्हिडीओ नक्की बघा…

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर उद्योगपती आनंद महिंद्र यांनी पहिल्यांदा ही स्वच्छता संस्कृती देशभर पसरवण्याची इच्छा व्यक्त केली. व्हिडीओ रिपोस्ट करीत त्यांनी लिहिले, “स्वप्न पाहण्यात मदत करू शकत नाही; पण जर याची संपूर्ण देशात पुनरावृत्ती झाली तर…” पीटीआयच्या अहवालानुसार, इंदूर शहर कचरा व्यवस्थापनावर दरवर्षी २०० कोटी रुपये खर्च करते. ८५० वाहने दररोज शहरातून फिरतात आणि ६९२ टन ओला, ६८३ टन सुका व १७९ टन प्लास्टिक कचरा गोळा करतात, असं एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या @anandmahindra अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकरी प्रशंसा करीत आहेत. अनेकांनी शहराच्या संस्कृतीचे आणि तेथील लोकांचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, ”स्वच्छता आणि सुव्यवस्था या केवळ संगोपनाच्या बाबी नाहीत, त्या मानवाच्या आवश्यक गरजांपैकी एक आहेत.” दुसऱ्या युजरने लिहिले, ”स्वच्छतेला प्राधान्य देणाऱ्या इंदूरमधील रहिवासी अधिक शहरांमध्ये असतील, तर भारत खूप वेगळा दिसेल.” तर तिसऱ्या युजरने लिहिले, ”सर, जर हे संपूर्ण देशात लागू केले गेले, तर भारत हे जगातील सर्वांत स्वच्छ ठिकाण असेल.”