कर्नाटकमधील महिंद्राच्या शोरुममध्ये एका शेतकऱ्यासोबत झालेल्या गैरवर्तवणुकीच्या प्रकरणासंदर्भात महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आनंद महिंद्रांनी घडलेल्या सर्व प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केलीय. आनंद महिंद्रांनी यासंदर्भात ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवलीय. महिंद्रा यांनी या ट्विटमध्ये आपल्या कंपनीची मुल्य काय आहेत याबद्दल भाष्य केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय?
तुमकुरूमध्ये केम्पेगौडा नावाचा एक शेतकरी हा बोलेरो पिकअप खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी सेल्समनने त्याचा अवतार पाहून त्याच्याशी उद्धटपणे बोलत त्याला चुकीची वागणूक देत अपमानित केले. या शेतकऱ्याला सेल्समनने शोरुममधून निघून जाण्यास सांगितले. “या कारची किंमत १० लाख रुपये आहे आणि तुमच्या खिशात कदाचित १० रुपये देखील नसतील,” असं म्हणत सेल्समनने शेतकऱ्याचा अपमान केला. सेल्समनने शेतकऱ्याचा पेहराव पाहून त्याला शोरुमधून बाहेर काढले, असा आरोप केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांनी केला.

१० लाख घेऊन आला…
सेल्समनने दिलेल्या वागणुकीमुळे शेतकरी आणि सेल्समनमध्ये वाद झाला. त्यानंतर केम्पेगौडा यांनी सेल्समनला एका तासाच्या आत पैसे आणल्यास त्याच दिवशी एसयूव्हीची डिलिव्हरी करण्याची हिंमत आहे का, अशी विचारणा करत थेट आव्हान दिलं. त्यानंतर शेतकरी तासभरात शोरुममध्ये तब्बल १० लाख रुपये घेऊन आला. त्याला पाहून सेल्समनसहीत शोरुममधील अधिकारी देखील स्तब्ध झाले.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रांनी दिलेला शब्द पाळला; किक स्टार्ट जुगाड जीप बनवणारे सांगलीचे दत्तात्रय लोहार झाले बोलेरोचे मालक

पण गाडी घेतली नाही कारण
मुख्य म्हणजे या शेतकऱ्याने महिंद्राच्या शोरुममधील अधिकाऱ्यांची चांगलीच गोची केली. शेतकऱ्याने दिलेल्या चॅलेंजप्रमाणे ते गाडीची त्याच दिवशी डिलीव्हरी देऊ शकले नाहीत. गाडीसाठी बराट वेटिंग पिरिएड असल्याने ते गाडी देण्यास असमर्थ ठरले. मात्र आम्ही चार दिवसांत गाडी पोहचवू अशी हमी शोरुमकडून देण्यात आली. तसेच त्यांनी या शेतकऱ्याची बिनशर्त माफी देखील मागितली. परंतु “मला तुमच्या शोरूममधून कार घ्यायची नाही,” असं म्हणत शेतकरी त्याचे १० लाख रुपये घेऊन निघून गेला.

आनंद महिंद्रा म्हणाले…
या साऱ्या प्रकरणाची सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा झाल्यानंतर आता कंपनीचे मालक असणाऱ्या आनंद महिंद्रांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरुन आनंद महिंद्रांनी घडलेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईचे संकेत दिलेत. “महिंद्रा राइजमध्ये आम्ही आपल्या सर्व समुदायला आणि सर्व हितधारांच्या हिताचा आणि उद्धाराचा विचार करण्याची मूल्यं जपतो. तसेच व्यक्तीचा मान-सन्मान कायम राखला जावा हे दुसरं मुख्य मूल्य आम्ही जपतो. याच संदर्भात कोणत्याही पद्धतीची गडबड झाली तर त्या प्रकरणाकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष दिलं जाईल,” असा शब्द आनंद महिंद्रांनी ट्विटरवरुन दिलाय.

या ट्विटवर आनंद महिंद्रांनी केला रिप्लाय…
आनंद महिंद्रांनी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकरा यांच्या ट्विटला रिट्विट करत हे वक्तव्य केलंय. नाकरा यांनी कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. “डीलर हे ग्राहक केंद्रित अनुभव देण्यासाठी पुरवठा साखळीमधील एक महत्वाचा भाग आहेत. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचा सन्मान करतो. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच थेट ग्राहकांशी संबंध असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गरज पडल्यास प्रशिक्षणही दिलं जाईल,” असं नाकरा यांनी म्हटलं होतं.

हा प्रकार समोर आल्यापासून सोशल नेटवर्किंगवरुन संबंधित शोरुममधील अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी केल्याचं पहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra message after karnataka farmer humiliation at suv showroom scsg
First published on: 25-01-2022 at 20:33 IST