‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीचे आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या ‘व्हॉट्स अॅप वंडर बॉक्स’ मधून काही भन्नाट व्हिडिओ किंवा कल्पना इतरांसोबत शेअर करतात. जे जे चांगले हे आत्मसात करावं आणि इतरांनींही त्याचा लाभ घ्यावा अशा मताचे ते आहेत. ट्विटरवर ते सर्वाधिक सक्रिय असतात. यावेळी महिंद्रा यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं तसेच संसदेच्या प्रत्येक सदस्यानं पाहावा अशी विनंती त्यांनी केली आहे. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वोत्तम वक्ता म्हणत मुक्तकंठाने अटलजींची स्तुती केली होती. त्यांचे भाषण आताच्या पीढीनं ऐकावं आणि नक्कीच त्यांच्या वर्तनातून प्रेरणा घ्यावी असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना संयुक्त राष्ट्र संघात भारताची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी अटलबिहारी यांना पाठवले होते. आणि ती भूमिका साकारत असताना आपल्या देशातील सरकारविरोधात परदेशी भूमीत वाजपेयी यांनी टीकेचा एक शब्ददेखील काढला नव्हता.

जेव्हा देश संकटात असतो तेव्हा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सगळ्यांनी देशहितासाठी एकत्र यायचं असतं हा मोलाचा सल्ला वाजपेयी यांनी त्यावेळी भाषणात दिला होता. आपण लोकशाहीत वावरत आहोत आणि त्यावेळी कोणत्या गोष्टींचं भान आपण ठेवावं आणि आपली वर्तणूक कशी असावी हे जर समजून घ्यायचं असेल तर अटलबिहारी वाजपेयी यांना आवर्जून ऐकावं असंही ते म्हणाले.