महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. ते ट्वीट्सच्या माध्यमातून कधी विचारणा, तर कधी कौतुक, तर कधी आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. उद्योग विश्वासोबतच समाजात घडणाऱ्या घडामोडींवर ते कायम आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. नुकताच त्यांनी मुंबईतील कांदवली भागातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक हरीण रस्ता पार करताना दिसत आहे. त्यांनी नुसता फोटो शेअर केला नाही तर ‘एक्सयूव्ही ५००’ या गाडीचं प्रमोशन करायला देखील विसरले नाहीत. हा फोटो त्यांनी काही तासांपूर्वी शेअर केला आहे. म्हणजेच हे हरीण शनिवारी कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचं त्यांनी ट्वीटमधून दर्शवलं आहे. या ट्वीटनंतर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटर अकाऊंटचे आत्तापर्यंत ८४ लाख फॉलोअर्स झाले असून त्यांचे ट्विट्स नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत असतात.

“या फोटोवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू. मुंबईच्या कांदिवलीत हे हरीण रस्ता ओलांडताना दिसत आहे. तिथे आमचा ऑटो आणि ट्रॅक्टर प्लांट आहे. त्यामुळे विचार करून कमेंट्स करा. महिंद्रा अँड महिंद्रा फॅक्टरीत तपास करणारा हा जॉन ‘Deere’ आहे ! त्यावर माझं उत्तर, कदाचित त्याचा पाठलाग चित्ता करत आहे. (एक्सयूव्ही ५००)”, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

याआधी देखील आनंद महिंद्रा यांनी केलेले ट्वीट विशेष चर्चेत राहिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करण्याआधी आनंद महिंद्रा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच परखड बोल सुनावले होते. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लादल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले होते.