Anand Mahindra UK Rickshaw Viral Video: महिंद्रा समुहाचे अध्यक्ष सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सवर ते सातत्याने काहीतर शेअर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आता त्यांनी असाच एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे.

आनंद महिंद्रा यांनी नुकतेच ब्रिटनच्या रस्त्यांवर धावत असलेल्या महिद्रा कंपनीच्या रिक्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक चालक महिंद्राची रिक्षा चालवताना दिसत आहे. या व्हिडिओला महिंद्रांनी, “आता युकेच्या रस्त्यांवरही रिक्षा धावू लागली आहे. तुम्हाला माहित आहेच, ही रिक्षा महिंद्रा कंपनीची आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया देताना म्हटले, “काय डाऊनफॉल आहे हा. दुगना लगान का बदला ऐसे लेगा महिंद्रा.”

पुढे दुसरा एक युजर म्हणाला, “युके वाल्यांना २०० वर्षांनंतर वासाहतवादाची चव चाखायला मिळत आहे. सर, आत लंडनच्या पावसातही ऑटोचालक म्हणेल, ओ साहेब त्या बाजूला जाऊ नका तिकडे खूप ट्राफिक आहे. भरतासाठी अभिमानाचा क्षण!”

महिंद्रा समुहाचा इतिहास

महिंद्रा उद्योग समुहाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास आहे. १९४५ मध्ये स्थापन झालेल्या महिंद्रा समुहाने भारतात पोलादाचा व्यापार करणारी कंपनी म्हणून आपला प्रवास सुरू केला. गेल्या काही दशकांत, तिचे रूपांतर जगातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एकामध्ये झाले असून, ती आपल्या मजबूत आणि विश्वासार्ह वाहनांसाठी ओळखली जाते.

महिंद्राने अमेरिकेतील विलीस कंपनीकडून परवाना घेऊन जीप वाहनांची जुळणी करून आपल्या वाहन उद्योगाची सुरुवात केली. येथूनच टिकाऊ एसयूव्ही आणि ऑफ-रोड वाहनांच्या निर्मितीतील त्यांच्या वारशाची सुरुवात झाली. भारतासाठी अनुकूल असलेल्या आपल्या दणकट वाहनांमुळे कंपनीने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला.

१९७० आणि १९८० च्या दशकात महिंद्राने ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांचे उत्पादन सुरू केले. १९९० च्या दशकात महिंद्रा बोलेरोच्या लाँचिंगने त्यांना मार्केटमध्ये एक आघडीची कंपनी म्हणून प्रस्थापित केले.