के. कृष्णा मुर्ती हे आंध्र प्रदेशमधील श्रीकाकूलम येथील पोलीस स्थानकामध्ये हवालदार म्हणून काम करतात. मात्र करोनाकाळामध्ये पहिल्या फळीतील कर्मचारी म्हणून काम करतानाच कृष्णा हे अनेक गरिबांसाठी सध्या आधारवड ठरले आहेत. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कृष्णा यांनी स्वत:चा पगार कमी असतानाही मासिक पगारातील १० हजार रुपये बाजूला काढून गरजुंची मदत करण्यास सुरुवात केली आहे. आज कृष्णा यांच्या याच दातृत्वामुळे अनेक गरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे.

कृष्णा हे पोलीस स्थानकामध्ये तक्रारी नोंदवून घेण्याचं काम करतात. कोणतीही गरीब व्यक्त तक्रार नोंदवण्यासाठी आल्यास कृष्णा त्यांना मदत करतात. कृष्णा यांची नियुक्ती पर्वतीपूरम पोलीस स्थानकामध्ये करण्यात आली आहे. हे पोलीस स्टेशन श्रीकाकूलम जिल्ह्यातील कोट्टूगुमाडा गावामध्ये आहे. कृष्णा यांनी आपल्या पगारातून १० हजार रुपये बाजूला काढून त्या पैशांमधून गरिबांना अन्नधान्य आणि कपडे पुरवण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे कृष्णा आता हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृद्ध गरजूंना चादरी आणि ब्लँकेटचेही वाटप करत आहेत.

कृष्णा हे दरमहिन्याला ३० गरजू व्यक्तींना मदत करतात. “मी हे काम मागील तीन वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून करत आहे,” असं कृष्णा सांगतात. मी स्वत: लहान असतानाच माझे आई-बाबा आणि आजी-आजोबा गरजुंना मदत करताना मी पाहिलं आहे, त्यामधूनच मला ही प्रेरणा मिळाली असंही कृष्णा सांगतात. “माझ्या पालकांचे आणि आजी-आजोबांच्या या कामाचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या कामातून मला प्रेरणा मिळाली. मी पोलीस खात्यात नोकरीला लागल्यानंतर मला शक्य होईल त्या पद्धतीने लोकांना मदत करु लागलो. मी दर महिन्याला तीस जणांना मदत करतो. दर महिन्याला मी काही गरीब व्यक्तींना कपडे आणि इतर आवश्यक गोष्टींचे वाटप करतो. माझ्या पगाराच्या पैशामधून मी ही मदत करतो. दर महिन्याला पाच आणि सहा तारखेला मी हे सामान त्यांना देतो,” असं कृष्णा सांगतात.

फोटो सौजन्य: द न्यू इंडियन एक्सप्रेस वरुन साभार

“मला ४५ हजार रुपये टेक होम सॅलरी मिळते. त्यापैकी मी १० हजार रुपये हे गरिबांसाठी खर्च करतो,” असं कृष्णा यांनी सांगितलं आहे.