करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अनेकांना फटका बसला. अनेक उद्योदधंदे या काळात बंद होते. देशातील अनेकांना या काळात आपली नोकरी गमवावी लागली. आंध्र प्रदेशात पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षकाचीही लॉकडाउन काळात नोकरी गेल्यामुळे त्याच्यावर केळी विकण्याची वेळ आली आहे. ४३ वर्षीय सुब्बैया हे आंध्र प्रदेशातील नेल्लोरचे रहिवासी आहेत. गेली १५ वर्ष सुब्बैया शिक्षकाची नोकरी करत आहेत. मात्र मार्च महिन्यात त्यांना अचानक नोकरीवरुन कमी करण्यात आलं ज्यामुळे त्यांच्यावर सध्या संकटाचा काळ आला आहे. पण अशा परिस्थितीतही हार न मानता सुब्बैया यांनी केळी विकत आपला संघर्ष सुरु ठेवला आहे.

दोन वर्षांपूर्वी सुब्बैया यांनी मुलाच्या उपचारासाठी ३ लाखांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सुब्बैया यांनी अखेरीस केळी विकण्याचा पर्याय निवडला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुब्बैया यांनी बीएड केल्यानंतर पॉलिटीकल सायन्स आणि तेलगूमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सुब्बैया यांना दोन मुलं असून एकाचं वय ६ तर एकाचं वय ५ वर्ष आहे. सुब्बैया काम करत असलेल्या खासगी कॉलेजमध्ये एप्रिल, मे महिन्याच्या पगारासाठी सर्व शिक्षकांना पुढील वर्षासाठी जास्तीत जास्त मुलांचं अ‍ॅडमिशन करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. जे शिक्षक जास्त अ‍ॅडमिनश करतील त्यांना पगार मिळणार अशी अट घालण्यात आली होती. पण लॉकडाउन काळात कोणतेही पालक विद्यार्थ्यांचं अ‍ॅडमिनश करण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यामुळे अखेरीस कॉलेज प्रशासनाने सुब्बैया यांना ५० टक्के पगार देऊन कामावरुन काढून टाकलं. आपली अडचण मित्राला सांगितल्यानंतर त्याने सुब्बैया यांना केळी विकण्याचा सल्ला दिला. दिवसाला १००० रुपये गुंतवल्यानंतर २०० रुपयांची कमाई होते, हे समजल्यानंतर सुब्बैया यांनी २० मे पासून केळी विकायला सुरुवात केली. आपल्यासाठी कोणतंही काम छोट नसून, सध्या आपल्या परिवारासाठी कमाईचं हेच साधन असल्याचं सुब्बैया यांनी सांगितलं.