कधी कधी हीरो होण्यासाठी ना कॅमेरा लागतो, ना स्टेज; फक्त माणुसकीचं मन लागतं. रस्त्यावर घडलेला एक छोटासा क्षण एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो. आंध्र प्रदेशमधून समोर आलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी, तर मनात अभिमान निर्माण झाला आहे. या व्हिडीओत एक महिला कॉन्स्टेबल आपल्या बाळाला कुशीत धरून, कोणताही आदेश नसताना, कोणतीही वर्दी न घालता, अॅम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करताना दिसते.
हा व्हायरल व्हिडीओ आंध्र प्रदेशमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरचा आहे. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या अॅम्ब्युलन्सला वाट रिकामी करून देण्यासाठी एक महिला स्वतः पुढे येते. विशेष म्हणजे ही महिला कोणती सामान्य नागरिक नसून, आंध्र प्रदेश पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल जयशांती आहे. त्या वेळी त्या ड्युटीवर नव्हत्या; पण तरीही त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केल.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, जयशांती आपल्या लहान बाळाला कुशीत घेऊन रस्त्यावर उभ्या आहेत. समोर ट्रॅफिकची मोठी कोंडी झालेली आहे आणि अॅम्ब्युलन्स हॉर्न वाजवीत वाट काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी जयशांती स्वतः रस्त्यावर येतात. एका हातात बाळ सांभाळत, दुसऱ्या हातानं त्या वाहनचालकांना बाजूला जाण्याच्या सूचना देतात.
पाहा व्हिडीओ
कुणावर ओरड नाही, कुणाशी वाद नाही; फक्त शांतपणे, आत्मविश्वासाने व माणुसकीने त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. काही मिनिटांतच अॅम्ब्युलन्स पुढे निघते आणि आजारी रुग्णाला वेळेत मदत मिळते. हा क्षण पाहणाऱ्यांसाठी खरंच थक्क करणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लोकांनी जयशांती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
कुणी लिहिलं आहे, “वर्दी असो वा नसो, पोलिस मनात असला की, कर्तव्य आपोआप दिसतं.” तर कुणी म्हटलं, “ही फक्त कॉन्स्टेबल नाही, ती एक आई आहे, एक रक्षक आहे.” अनेकांनी या कृतीला “खऱ्या माणुसकीचं उदाहरण” म्हटलं आहे. काही युजर्सनी तर सरकारकडून त्यांचा सन्मान व्हावा, अशीही मागणी केली आहे.
