Dangerous Truck Driving Video Viral : सध्या एक थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये एक ट्रक चालक वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवून सुसाट वेगाने गाडी पळवताना दिसत आहे. इतर वाहनांना अगदी घासून (कट मारून) हा ट्रक पुढे जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा निष्काळजी आणि बेजबाबदार चालकांमुळेच हे प्रमाण वाढत असून, यात सामान्य नागरिकांचा नाहक बळी जातो. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक अतिशय वेगाने जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पुढच्या ट्रकमधून रेकॉर्ड करण्यात आला असून, मागचा ट्रक त्याच ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी प्रचंड वेगाने येत आहे.
व्हिडीओमध्ये पुढे असे दिसते की, मागचा ट्रक पुढच्या ट्रकला ओव्हरटेक करणार होता; पण तेवढ्यात दुसऱ्या बाजूने आणखी एक ट्रक येताना दिसतो. मात्र, तो ट्रक चालक आपला ट्रक थांबवत नाही, तर थेट कट मारून आपला ट्रक त्या दोन्ही ट्रकमधून बाहेर काढतो. या दरम्यान त्या ट्रकची चाके आधी डाव्या बाजूने आणि नंतर उजव्या बाजूने, म्हणजेच दोन्ही बाजूंनी हवेत उडतात. अशा परिस्थितीत भीषण अपघात होण्याची दाट भीती होती. परंतु, कसलाही विचार न करता तो ट्रक चालक निघून गेला. यावेळी रस्त्यावर पूर्णपणे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
भयानक ट्रक ड्रायव्हिंगचा हा व्हिडीओ @SumanRastogi6 नावाच्या एक्स (X) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “या नराधमावर तात्काळ कारवाई करा,” अशी मागणी नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि इतक्या बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख काय, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत वाहन कधीही अशा बेदरकारपणे चालवू नका, असा सल्ला लोक देत आहेत; कारण अशाच चुकांमुळे भीषण अपघात घडतात.
