शिक्षक हे मुलांचे भविष्य घडविण्याचे काम करतात. कधी ते चांगल्या कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतात, तर कधी चुकीची वर्तणूक केल्याबद्दल शिक्षाही देतात. तुम्हालाही तुमच्या शिक्षकाकडून कधी ना कधी एखाद्या चुकीबद्दल शिक्षा मिळाली असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चांगली कामगिरी करावी, अशी पालकांप्रमाणेच अनेक शिक्षकांचीही प्रामाणिक इच्छा असते. यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांनी काही चूक केली तर प्रसंगी शिक्षाही करतात. मात्र, सध्याच्या काळात शिक्षक मुलांना ओरडले तरीही पोलकांना राग येतो. शिवाय याबाबत ते शिक्षकांना जाब विचारतात. याबाबतच्या अनेक घटना तुम्हीही सोशल मीडियावर पाहिल्या असतील.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलाला शिक्षकांनी शिक्षा केली म्हणून संतापलेल्या वडिलांनी शाळेत जाऊन शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला शिक्षा देणारे शिक्षक मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसलेले दिसत आहेत. यावेळी ज्याला शिक्षा केली होती तो विद्यार्थीही सोफ्यावर बसलेला दिसत आहे. शिक्षकाची एवढीच चूक होती की त्याने शिक्षा म्हणून मुलाला उठाबशा काढायला सांगितलं होतं. या गोष्टीवर विद्यार्थ्याच्या वडिलांना राग आला आणि त्यांनी थेट मुख्याध्यापकांच्या कार्यालयात घुसून शिक्षकाला मारहाण केली आहे.
व्हिडीओत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या वडिलांच्या भांडणाचा आवाज ऐकून शाळेतील अतर शिक्षक मुख्याध्यापकांच्या कार्यालयात येतात. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकाला मारहाण होत असताना इतर कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे जाण्याचा प्रयत्नही करत नसल्याचं व्हिडीओत दिसत नाही. त्यामुळे इतर शिक्षकांच्या समोर मुलाच्या वडिलांनी शिक्षकाला खूप मारहाण केली. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर काही लोकांनी हस्तक्षेप करत मुलाच्या वडिलांना थांबवलं. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विद्यार्थ्याने देखील आपल्या वडिलांना रोखण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. तर ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील हनुमंत विहार येथील एका शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे.
नेटकरी संतापले –
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी शिक्षकाला मारहाण करणाऱ्या वडिलांवर संतापले असून त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “यूपीमध्ये दररोज अशा काही ना काही घटना घडणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांनी गुंडांवर कडक कारवाई करावी.” तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “शिक्षा म्हणून मुलाला उठाबशा काढायला लावणे यात काही गैर नाही. मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शिक्षक शिक्षा करत असतात. ही लज्जास्पद घटना आहे.”