पुष्कर मेळ्यात २३ कोटी किंमत असलेल्या अनमोल या म्हशीचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र ही बातमी काही तासांतच अफवा ठरली. पुष्करच्या मेळ्यातील ही म्हैस मेल्याची अफवा कशी पसरली? नेमकं काय घडलं? जाणून घेऊ.
२३ कोटी किंमत असलेली म्हैस मेल्याची अफवा
पुष्करच्या मेळ्यात आलेली २३ कोटी किंमत असलेली म्हैस मेली अशी अफवा सोशल मीडियावर पसरली. तसंच ही बातमीवजा अफवा व्हायरलही झाली. काही चॅनल्सनीही माहितीची पुष्टी न करताच ही म्हैस मेल्याची बातमीही चालवली. त्यामुळे पुष्करच्या मेळ्यात आलेल्या पशू पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यानंतर पशुपालन विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहचले. त्यांनी ही माहिती दिली की पुष्कर मेळ्यातील या २३ कोटींच्या म्हशीला काहीही झालेलं नाही. तिला आरोग्याच्या काहीही तक्रारी नाहीत. ही म्हैस अगदी व्यवस्थित आहे पूर्णतः सुदृढ आहे. या म्हशीचं नाव अनमोल असं आहे.

म्हशीच्या मालकाने नेमकं काय सांगितलं?
म्हशीच्या मालकाकडे जेव्हा माध्यमं गेली तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही जी म्हैस इथे आणली आहे तिला काहीही झालेलं नाही. तिला थोडा थकवा आला होता त्यामुळे आराम करायला नेलं होतं. पण आता तिची प्रकृती एकदम ठीक आहे. पुष्कर मेळ्यात ही म्हैस चर्चेचा विषय ठरली आहे. पण तिच्या मृत्यूची अफवा पसरली. मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की अफवांवर विश्वास ठेवू नका. पुष्कर मेळ्याचा आनंद लुटा. असं आवाहन म्हशीच्या मालकाने केलं आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. आराम करणाऱ्या म्हशीचा व्हिडीओ कुणीतरी पोस्ट केला आणि ही म्हैस मेल्याची बातमी व्हायरल झाली. त्यामुळे ही अफवा पसरली अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान या म्हशीला काहीही झालेलं नाही असं म्हशीच्या मालकाने स्पष्ट केलं आहे.
पुष्करच्या मेळ्यातले पशू ठरले चर्चेचा विषय
पुष्करच्या मेळ्यात देशभरातील प्राणी पालकांची गर्दी झाली आहे. हरियाणा, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेशातून आलेल्या म्हशी, घोडे, उंट हे पुष्कर मेळ्याची शोभा वाढवत आहेत. अनेक पशू पालकांनी त्यांच्या प्राण्यांना एसी वाहनांतून इथे आणलं आहे. पशूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी त्यांचे मालक घेताना दिसत आहेत.
अनमोलचा खुराक कसा आहे?
दररोज ‘अनमोल’ला २५० ग्रॅम बदाम, ४ किलो डाळिंब, ३० केळी, ५ लिटर दूध आणि २० अंडी दिली जातात. त्याचबरोबर तिला तूप, सोयाबीन, मका, तेलकट खाद्यपदार्थ आणि हिरवा चारा दिला जातो. तिच्या मालकाने सांगितले की, अनमोलला रोज दोन वेळा बदाम आणि मोहरीच्या तेलाने मालिश केली जाते, ज्यामुळे तिचा कोट चमकदार आणि त्वचा मऊ राहते.
