Who is Anu Sharma: भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अनु शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गूगलसारख्या ड्रीम कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर तिने अचानक राजीनामा देत पलंतिर टेक्नोलॉजीज (Palantir Technologies) कंपनी जॉइन केली आहे.
अनु शर्माच्या या करिअर बदलामुळे इंटरनेटवर नवीन चर्चा सुरू झाली आहे, कारण सामान्यतः गूगलला टेक क्षेत्रातील लोकांचे अंतिम स्वप्न मानले जाते. मात्र अनु हिने वेगळा मार्ग निवडत हे सिद्ध केलं की ती फक्त मोठ्या नावासाठी नाही, तर प्रभावी आणि महत्त्वाच्या भूमिकेसाठी काम करू इच्छिते.
इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर लाखो फॉलोअर्स असलेली अनु आता टेक क्षेत्रासाठी नवी प्रेरणा बनली आहे. तिचा हा निर्णय गूगलच्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर पडण्याचं धाडसी उदाहरण मानलं जात आहे.
कोण आहे अनु शर्मा आणि कसा राहिला तिचा प्रवास?
अनु शर्माने इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर विमेन (IGDTUW) मधून बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने करिअरच्या सुरुवातीपासूनच मोठ्या ब्रँड्ससोबत काम करण्यास सुरुवात केली होती. अनुने २०२२ मध्ये बंगळुरूमध्ये ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) आणि २०२३ मध्ये हैदराबादमध्ये गूगलमध्ये इंटर्नशिप केली होती. याशिवाय तिने इंट्युइट (Intuit) सारख्या कंपनीतही अनुभव घेतला.
२०२४ मध्ये ती फुल-टाईम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून गूगलमध्ये रुजू झाली, जिथे तिने एक वर्षाहून अधिक काळ काम केलं. अलीकडेच तिने पलंतिरमध्ये फॉरवर्ड डिप्लॉयड सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारली आहे.
पलंतिर टेक्नोलॉजीज आणि अनुची नवीन भूमिका?
पलंतिर टेक्नोलॉजीजची स्थापना २००३ मध्ये पीटर थिएल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. या कंपनीचं नाव ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’मधील ‘सीइंग स्टोन्स’वरून प्रेरित आहे. ही कंपनी मुख्यतः डेटा अॅनालिटिक्स आणि सरकारी सॉफ्टवेअरवर काम करण्यासाठी ओळखली जाते.
अनुने गूगलसारखी मोठी कंपनी सोडून पलंतिरसारख्या डेटा कंपनीत जाणं हे तिच्या करिअरमधील महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. येथे ती फॉरवर्ड डिप्लॉयड सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार आहे. या भूमिकेत ग्राहकांच्या कठीण समस्यांचे समाधान आणि डेटाचं प्रभावी विश्लेषण करण्यावर भर दिला जातो.
कॉर्पोरेट करिअरसोबत इतर यशही
अनु शर्माचं व्यक्तिमत्त्व फक्त कॉर्पोरेट नोकरीपुरतं मर्यादित नाही. ती फ्रीलान्स टेक्निकल ब्लॉगर म्हणूनही सक्रिय राहिली आहे आणि अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचा भाग बनली आहे. तिने ‘X’च्या ‘DevelopHER 2021’ उपक्रमात आणि मॅकिन्से अँड कंपनीच्या ‘नेक्स्ट जेन विमेन लीडर्स’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. याशिवाय तिने उबरच्या ‘She++’ कार्यक्रमातही योगदान दिलं आहे.

सोशल मीडियावर तिची चांगली लोकप्रियता आहे. इंस्टाग्रामवर तिचे २.३ लाख आणि लिंक्डइनवर सुमारे २.३८ लाख फॉलोअर्स आहेत. येथे ती एआय आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटविषयी आपले विचार शेअर करत असते.
