Apple iPhone 18 & Ultra Launch: ॲपल कंपनी आपल्या पहिल्याच फोल्डेबल आयफोनची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. या फोनचं नाव iPhone Ultra असू शकतं. हा फोन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सोबत कंपनीच्या दरवर्षी होणाऱ्या सप्टेंबरमधील लॉन्च इव्हेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, हा इव्हेंट ८ किंवा ९ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तसेच, १० किंवा ११ सप्टेंबरपासून या फोनची प्री-ऑर्डर सुरू होऊ शकते.

रिपोर्टमधील माहिती खरी ठरली, तर iPhone Ultra हा ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन ठरेल. या फोनची सुरुवातीची किंमत २,००० अमेरिकी डॉलर (भारतीय चलनात सुमारे १.८८ लाख रुपये) असू शकते. मात्र, भारतात कर आणि इतर शुल्कामुळे या फोनची किंमत २ लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये ॲपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Ultra सोबत iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max देखील सादर केले जाऊ शकतात.

Apple iPhone Ultra अपेक्षित किंमत

रिपोर्टनुसार, फोल्डेबल iPhone Ultra ची सुरुवातीची किंमत २,००० अमेरिकी डॉलर, म्हणजेच करापूर्वी सुमारे १.८८ लाख रुपये असू शकते. भारतात आयात शुल्क आणि स्थानिक किंमतीमुळे या फोनची किंमत २ लाख रुपयांपेक्षा जास्त जाऊ शकते. त्यामुळे हा बाजारातील सर्वात महागड्या फोल्डेबल स्मार्टफोनपैकी एक ठरू शकतो.

Apple iPhone 18 Pro अपेक्षित किंमत

iPhone 18 Pro च्या किंमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, या फोनची सुरुवातीची किंमत १,३९९ अमेरिकी डॉलर (सुमारे १.३२ लाख रुपये) असू शकते. तुलनेत, iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत १,०९९ अमेरिकी डॉलर होती.

मेमरी आणि स्टोरेजच्या वाढलेल्या खर्चामुळे या फोनच्या किंमतीत वाढ होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. यापूर्वीही ॲपलने MacBook आणि iPad यांसारख्या अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत.

Apple iPhone Ultra, iPhone 18 Pro अपेक्षित फीचर्स

iPhone Ultra आणि iPhone 18 Pro या दोन्ही फोनमध्ये ॲपलचा नवीन A20 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, हे दोन्ही फोन iOS 27 या ऑपरेटिंग सिस्टिमसह येण्याची शक्यता आहे.

Google Trends

iPhone 18 Pro चा डिझाइन मोठ्या प्रमाणात आधीच्या मॉडेलसारखाच राहू शकतो. मात्र, या फोनमध्ये काही नवीन रंगांचे पर्याय मिळू शकतात. कॅमेऱ्याचे रिझोल्यूशन बदलणार नसले तरी, मुख्य कॅमेऱ्यात व्हेरिएबल अपर्चर तंत्रज्ञान दिलं जाऊ शकतं. यामुळे प्रकाशाचं नियंत्रण अधिक चांगलं होईल, फोटोमध्ये विषय आणि पार्श्वभूमीतील फरक अधिक स्पष्ट दिसेल आणि व्हिडिओमध्ये पार्श्वभूमी अधिक नैसर्गिक पद्धतीने ब्लर दिसू शकते.

फोल्डेबल iPhone Ultra मध्ये मिळू शकणारे फीचर्स

  • फोन उघडल्यानंतर त्याची जाडी सुमारे ४.५ मिमी असू शकते.
  • स्क्रीनवरील फोल्डची रेषा कमी दिसावी यासाठी खास डिझाइन केलेला हिंज दिला जाऊ शकतो.
  • मागील बाजूला आडव्या रचनेत ड्युअल रिअर कॅमेरा असू शकतो.
  • ॲपलचं Camera Control बटण दिलं जाऊ शकतं.
  • मोठा फोल्डेबल डिस्प्ले आणि स्प्लिट-स्क्रीन मल्टीटास्किंग फीचर मिळू शकतं, ज्यामुळे एकाच वेळी अनेक कामं करणं अधिक सोपं होईल.

तुलनेसाठी सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy Z Fold 7 हा फोन उघडल्यानंतर सुमारे ४.२ मिमी जाडीचा असू शकतो, अशी चर्चा आहे. यावरून फोल्डेबल स्मार्टफोन अधिक पातळ बनवण्यावर कंपन्यांचा भर असल्याचं दिसून येतं.

ॲपलने अद्याप या फोनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे किंमत, फीचर्स आणि लॉन्चची तारीख याबाबतची सर्व माहिती सध्या फक्त रिपोर्ट्स आणि लीकवर आधारित आहे.