सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. लॉकडाउनमुळे अनेक देशांमध्ये अर्थचक्रही थांबवलं आहे. तसंच अनेकांच्या नोकऱ्यांवरही गदा आली आहे. अशा परिस्थितीत एका लीगल असिस्टंटनं तब्बल ६०० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तिला कोणतीही नोकरी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये राहणाऱ्या सिनीज सिम्पकिन या महिलेनं एका मुलाखतीदरम्यान याबात खुलासा केला. एबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबत सांगितलं.

“या कालावधीदरम्यान अनेकदा मी डिप्रेशनमध्येही गेली होती. मला माझं घर चालवण्यासाठी नोकरीची आवश्यकता होती. परंतु मला नोकरी मिळत नव्हती. तसंच आता मला माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण करता येणार नाही,” असं ती मुलाखतीदरम्यान म्हणाली. तसंच आता आयुष्यभर आपल्याला नोकरी शोधावी लागणार आहे, असं वाटत असल्याचंही तिनं सांगितलं. डगमलेल्या अर्थवस्थेमुळे केवळ सिडनीतच नाही तर संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये फिटनेस, एन्टरटेन्मेंट, हॉस्पीटॅलिटी, ट्रॅव्हल यांसारख्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर आता अकाऊंटिंग, रिटेल आणि मीडिया ही क्षेत्रदेखी ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी १९९१ मध्ये ऑस्ट्रेलियात आर्थिक मंदी आली होती. त्यादरम्यानही त्या ठिकाणी अवस्था बिकट झाली होती. त्यानंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा रूळावर येण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला होता. हळूहळू त्यांची अर्थव्यवस्था मार्गावर येत असतानाच करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे.