Employee Appraisal Question Viral Video : मार्च महिना सुरू होताच नोकरदारांना वेध लागतात ते पगारवाढीचे. देशभरातील अनेक कंपन्या याच महिन्यात अप्रेझलचे फॉर्म कर्मचाऱ्यांना देतात. तुमच्यापैकीदेखील अनेकांनी मागील वर्षभरात अचिव्ह केलेलं टार्गेट्स आणि भविष्यात ठेवलेल्या टार्गेट्सची माहिती फॉर्ममध्ये एव्हाना भरली असेल. काहींच्या मॅनेजमेंटबरोबर मिटिंग बाकी असतील, एवढं करून कुठे झाली तर पगारवाढ होईल. दरम्यान, पगारवाढीच्या मुद्द्यावरीलचं एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
एका कंपनीने नुकताच आपल्या नोएडा कॅम्पसमध्ये कंपनीचा ५० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले. कंपनीचे संस्थापकही व्हीलचेअरवर बसून सार्वजनिकरित्या उपस्थित होते. इतकचं नाही तर कंपनीचे सीईओदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते, ज्यांनी कमाल डान्स करत सर्वांनाच चकित केले.
यावेळी कार्यक्रमातील गर्दीत एका कर्मचाऱ्याने जोरात ओरडून विचारले की, सर अप्रेझल कधी? कर्मचाऱ्याचा हा प्रश्न ऐकून उपस्थित लोकही हसू लागले. हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, युजर्स त्याचा आनंद घेत आहेत.
या कार्यक्रमात केवळ कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेला अरिजीत सिंगचा एक खासगी कॉन्सर्टही होता. कॉन्सर्टदरम्यान कंपनीचे सीईओ चक्क स्टेजवर आनंदाने नाचत होते. यावेळी नाचता नाचता ते कर्मचाऱ्यांना हात दाखवत होते, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या गर्दीत एका कर्मचाऱ्याने ओरडून विचारले की, “सर, अप्रेझल कधी होणार?” हा प्रश्न जवळ उभ्या असलेल्या इतर लोकांनी ऐकला आणि ते जोरजोरात हसू लागले. तो कर्मचारी स्टेजपासून खूप दूर उभा असल्याने सीईओने ते खरंच ऐकले की नाही हे स्पष्ट नाही.
यावेळी एका कर्मचाऱ्याने ही घटना रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर @prajjwal_bhatia नावाच्या अकाउंटवरून शेअर केली आहे. एका व्यक्तीने गमतीने म्हटले की, “कर्मचाऱ्यांना हात दाखवून काहीच होणार नाही.” दुसऱ्याने म्हटले की, “कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ न करता हा कार्यक्रम साजरा केला जात आहे आणि ती रक्कम इव्हेंट मॅनेजमेंटसाठी वापरण्यात आली आहे.” तिसऱ्याने म्हटले की, “मित्रांनो, हेच तर अप्रेझल आहे.”
