अनेक जण आयुष्यभर मेहनत करतात तरीही त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही. पण, काही जण याला अपवाद असतात आणि ते फार कमी वयात यशाचे शिखर गाठतात. आता या चिमुकलीलाच पाहा ना. ती अवघी आठ वर्षांची असूनही ती कमी वयाची वेटलिफ्टर म्हणून ओळखली जाते आहे. कोण आहे ही चिमुकली? काय आहे तिची खासियत, चला पाहू.

अर्शिया गोस्वामी ही हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी आहे. चिमुकली केवळ आठ वर्षांची आहे. इतर शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणेच तिला मजा करायला आवडते आणि तिचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील आहे. पण, तिचे उत्साही व्यक्तिमत्त्व आणि नवीन गोष्टी शिकण्याबद्दलचे तिचे आकर्षण तिला इतर मुलांपेक्षा वेगळे बनवते. विशेष बाब म्हणजे अर्शियाला वेटलिफ्टिंगची आवड आहे. अर्शिया तिच्या वडिलांच्याच व्यायामशाळेत वेटलिफ्टिंगचा सराव करते.

हेही वाचा…VIDEO: सहलीला बनवू शकता घरच्यासारखं जेवण; पाहा चालत्या फिरत्या गाडीतलं ‘हे’ अनोखं स्वयंपाकघर

व्हिडीओ नक्की बघा :

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार अर्शियाने कमी वयातच ‘यंगेस्ट वेटलिफ्टर’चा विक्रम मोडला आहे. केवळ सहा वर्षे, ११ महिने व २७ दिवस इतके वय असताना ती ४५ किलो वजन उचलण्यात यशस्वी झाली होती. तसेच चिमुकलीच्या या खास कौशल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अधिकृतपणे २८ डिसेंबर २०२१ रोजी घोषणा करण्यात आली होती. एकदा पाहाच अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीचा वेटलिफ्टिंग करतानाचा व्हिडीओ.

अर्शियाचे वजन केवळ २५ किलो आहे; पण ती तिच्या शरीराच्या वजनापेक्षा दुप्पट वजन उचलू शकते. अलीकडेच तिच्या @fit_arshia या इन्स्टाग्राम अकाउंटवरील एका व्हिडीओमध्ये अर्शिया तब्बल ७५ किलो वजन उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे, “एक दिवस भारताला तुझा अभिमान वाटेल.” तर काही नेटकरी चिमुकलीच्या कौशल्याचे कौतुक करीत तिला “हॅट्स ऑफ” म्हणताना दिसत आहेत.