करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. करोना विषाणूला पूर्णपणे संपवायचं असेल तर लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सध्या देशात युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला लस देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर लसीकरणासंदर्भात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. गावकऱ्यांना करोना लस मिळावी म्हणून एका आरोग्य कर्मचाऱ्याने केवळ कर्तव्यासाठी आपला जीव धोक्यात घालून नदी पार केलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रत्येकजण त्याचं कौतूक करताना दिसून येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या खांद्यावर लशींच्या डोसने भरलेली एक पेटी लटकवलेली आहे. खाली खळखळून नदीचं पाणी वाहत असून ही नदी पार करण्यासाठी केवळ दोन बांबूच्या सहाय्याने एक कच्चा पूल बांधण्यात आलाय. करोना रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. कोरोना वॉरिअर्स असणारे डॉक्टर्स, परिचारिका आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांवर उपचार करत असून वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या व्हिडीओमधील आरोग्य कर्मचाऱ्याने सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन रुग्णसेवेसाठी केवळ दोन बांबूच्या सहाय्याने बनवलेल्या कच्च्या पूलावरून नदी पार करत गाव गाठ गाठलंय.

आपण एखाद्या बीचवर गेल्यानंतर समुद्रात साधी लाट जरी उसळली तरी आपला जीव घाबरतो. पण या आरोग्य कर्मचाऱ्याने धो-धो वाहणाऱ्या नदीच्या पाण्याची भीती न बाळगता केवळ कर्तव्यासाठी ही जोखीम पत्कारली आहे. या कच्च्या पूलावरून जात असताना छोटीशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकली असती. तसंच एखादा बांबू सटकला तरी त्याच्या जीव धोक्यात आला असता. परंतू त्याने कशाचीही पर्वा न करता या कच्च्या पूलावरून चालत जात ही नदी ओलांडली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अरूणाचल प्रदेश मधला आहे. ‘Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस.’ नावाच्या ट्विटर हॅंडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. कच्च्या पूलाच्या कडेला थांबलेल्या एका गावकऱ्याने हा व्हिडीओ शूट केला आहे आणि तो लगेचच व्हायरल झाला. कर्तव्य बजावण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

खरं तर भीतीपोटी अनेक जण लस घेण्यास नकार देणाऱ्या नागरिकांपुढे या आरोग्य कर्मचाऱ्याने एक आदर्श निर्माण केलाय. काही झालं तरी लस घेणार नाही, असं म्हणणाऱ्या नागरिकांनी हा व्हिडीओ पाहून एकदा विचार नक्कीच केला पाहिजे.