Cute girls singing Dance Video : सोशल मीडियावर रोज डान्स आणि गाण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ खळखळून हसवणारे असतात, तर काही इतके गोड असतात की ते पाहून आपल्या चेहऱ्यावर आपसूकच हसू उमलते. सध्या इंटरनेटवर अशाच एका चिमुकल्या गँगचा अत्यंत गोंडस आणि उत्साही व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो नेटीझन्सचे मन जिंकून घेत आहे. अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यातील ‘वांचो’ (Wancho) समाजातील तीन लहान मुलींचा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, एक चिमुकली एखाद्या अनुभवी गायकालाही लाजवेल अशा आत्मविश्वासाने सुंदर गाणे गात आहे, तर तिच्या बाजूला उभा असलेल्या इतर दोन लहान मुली गाण्याच्या तालावर जबरदस्त डान्स स्टेप्स करत आहेत. यावेळी तिघींच्याही चेहऱ्यावरील हावभाव (Expressions) आणि त्यांचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. हा मनमोहक व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटल्याशिवाय राहत नाही.
अरुणाचल प्रदेशातील निसर्गरम्य, हिरव्यागार डोंगरांच्या पार्श्वभूमीवर या तीन चिमुकल्या धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. या तिघींमधील एक चिमुकली २०१९ मध्ये आलेल्या ‘पती पत्नी और वो’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘अखियां मेरी पूछ रही हैं’ (Dheeme Dheeme) हे प्रसिद्ध गाणे गात आहे; तर बाकीच्या दोघी गाण्याच्या तालावर सुसंगत आणि तितक्याच सुंदर डान्स स्टेप्स करत आहेत. गाताना आणि नाचतानाचा या मुलींचा आत्मविश्वास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
गाण्यादरम्यान तिघींच्या चेहऱ्यावरील निरागसपणा आणि हावभाव इतके मोहक आहेत की, प्रेक्षकांची नजर त्यांच्यावरून हटत नाही. चिमुकल्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर @singka.wangjen या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटीझन्स कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
एका युझरने लिहिले, “एक खूप गोड गायिका आणि डान्स करणाऱ्या बाहुल्या, तिघीही खूप गोंडस आहेत, असेच पुढे जात राहा.” दुसऱ्याने कमेंट केली, “क्यूटनेस ओव्हरलोडेड (Cuteness Overloaded), खरंच हा व्हिडीओ पाहून माझा दिवस आनंदी झाला.” ईशान्य भारतातील कलाकारांचे कौतुक करत आणखी एकाने लिहिले, “ईशान्य भारत टॅलेंटने ओतप्रोत भरलेला आहे, यात तीळमात्र शंका नाही.” एकंदरीत, या चिमुकल्यांनी सिद्ध केले आहे की, टॅलेंट दाखवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते!
