Shocking Viral Incident at Airport: आंध्र प्रदेशातील भोगापूरम येथे नुकतेच सुरू झालेल्या अत्याधुनिक अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक धक्कादायक प्रकार सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या जागतिक दर्जाच्या विमानतळावर काही नागरिकांच्या वर्तनामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विमानतळ पाहण्यासाठी आलेल्या काही जणांनी सार्वजनिक मालमत्तेची जपणूक करण्याऐवजी अशी कृती केली की, त्याचे व्हिडीओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.
समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये काही लोक विमानतळावरील सजावटीच्या कारंजात उतरून पाण्यात खेळताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर काही जणांनी परिसरातील सजावटीची झाडे आणि कुंड्यांतील रोपे उपटून ती सोबत घेऊन जातानाचे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकारामुळे विमानतळाची सुरक्षा आणि नागरिकांची सार्वजनिक शिस्त यांबातवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विमानतळ की उद्यान?
भोगापूरममधील हा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आंध्र प्रदेशच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आधुनिक सुविधा, आकर्षक रचना आणि सुशोभित परिसर यांमुळे अनेक नागरिक केवळ विमानतळ पाहण्यासाठी येथे पोहोचत आहेत. मात्र, काही जणांनी या विमानतळाला, जणू एखादे सार्वजनिक उद्यान किंवा सहलीचे ठिकाणच समजल्याचे व्हिडीओत दिसून आले.
काही कुटुंबे हिरवळीवर बसून गप्पा मारताना दिसली, तर काही जण कारंजात उतरून पाण्यात खेळू लागले. त्यानंतर सर्वाधिक धक्कादायक प्रकार समोर आला. काही व्यक्ती सजावटीसाठी लावलेली रोपे आणि कुंड्यांतील झाडे उपटून थेट घरी घेऊन जात असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच संताप
हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या सार्वजनिक सुविधांची अशी हानी करणे अत्यंत चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना लिहिले, ‘फक्त आधुनिक इमारती उभारून विकास होत नाही. नागरिकांना सार्वजनिक शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.’
दुसऱ्या एका वापरकर्त्याने उपरोधिक टिप्पणी करीत म्हटले, “आता विमानतळावर सुरक्षा रक्षकांसोबत वन विभागाचे कर्मचारीही तैनात करावे लागतील, नाही तर झाडेही सुरक्षित राहणार नाहीत.”
तर आणखी एका व्यक्तीने, शालेय शिक्षणात सार्वजनिक शिस्त आणि सार्वजनिक मालमत्तेचे महत्त्व याविषयी स्वतंत्र अभ्यासक्रम असावा, अशी मागणी केली.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर संबंधित व्यक्तींची ओळख पटवून, त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर मोठा दंड आकारावा आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करावी, असे अनेकांचे मत आहे.
काही जणांनी या प्रकारामुळे केवळ विमानतळाची प्रतिमा मलीन होत नसून, सार्वजनिक ठिकाणांविषयीची निष्काळजी वृत्तीही समोर येत असल्याचे नमूद केले आहे.
सार्वजनिक शिस्त का महत्त्वाची?
विमानतळ, रेल्वेस्थानके, उद्याने किंवा इतर सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांची सामायिक मालमत्ता असते. अशा ठिकाणांची स्वच्छता आणि जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एका व्यक्तीची बेजबाबबदार कृती उभारलेल्या संपूर्ण व्यवस्थेची शोभा आणि त्या स्थळाची रचना खराब करू शकते.
भोगापूरम विमानतळावरील हा व्हायरल व्हिडीओ केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर सार्वजनिक मालमत्तेविषयीबाबत आपली मानसिकता काय आहे यावरही तो प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. विकासासाठी केवळ आधुनिक सुविधा उभारणे पुरेसे नसते, तर त्या सुविधांची जबाबदारीने जपणूक करणेही तितकेच आवश्यक असते. त्यामुळे अशा घटनांमधून धडा घेत, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी जबाबदारीने वागणे ही काळाची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.
