प्रेम आंधळं असतं असं म्हणतात पण प्रेमाला अक्कलही नसते का असा प्रश्न पडावा असे अनेक प्रकार आपण हल्ली सोशल मीडियावर पाहतो. या मंडळींसाठी नेटकऱ्यांनी तर खास निब्बा निब्बी संघटना म्हणून पेज सुद्धा सुरु केले आहेत. यांचे रील्स बघण्यापर्यंत तर ठीक होतं पण आता आसाम मधून एक असा धक्कादायक प्रकार समोर येत आहे ज्यावर विश्वास बसणंच कठीण आहे. आसाम मधील एका मुलीने आपल्या प्रेमाची साक्ष पटवून देण्यासाठी आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचे रक्त स्वतःच्या शरीरात चढवून घेतल्याचे समजत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही मुलगी अवघ्या १५ वर्षाची आहे.
आसाम मधील सुआलकुची जिल्ह्यातील ही घटना सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राप्त माहितीनुसार, या १५ वर्षीय मुलीची फेसबुक द्वारे हाजो येथील सातडोला येथे राहणाऱ्या एका मुलाशी ओळख झाली होती. तीन वर्षांपासून त्यांचं रिलेशन सुरु होतं.




सावधान! टॅटू काढल्याने दोघांना HIV ची लागण, १४ जण पडले आजारी; ‘या’ गोष्टी टॅटू काढताना तपासून घ्या
या मुलाला एचआयव्ही ची लागण झाल्याबाबत मुलीला संपूर्ण कल्पना होती मात्र जेव्हा याबाबत तिच्या कुटुंबियांना कळलं तेव्हा त्यांनी त्या दोघांच्या नात्याला विरोध केला तसेच त्या मुलाला न भेटण्याची सक्त ताकीद सुद्धा दिली. प्रेमात वेडी झाल्याने तिने एक नव्हे तर तीनदा आपल्या बॉयफ्रेंड सोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याच मार्गे तिला त्याच्या सोबत राहणे शक्य होत नव्हते, शेवटी आपल्या प्रेमाच्या मध्ये कुटुंबीयांचा अडथळा नको म्हणून या मुलीने एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त इंजेक्शनने शरीरात टोचून घेतलं.
दरम्यान, पोलिसांनी या एचआयव्ही ग्रस्त तरुणाला अटक केली आहे तर मुलीला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा प्रसंग घडत असताना त्याने अनेकदा या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मला माझ्या जीवाची पर्वा नाही असे म्हणत तिने इंजेक्शन टोचून घेतले. सदर प्रकरणानंतर या मुलीने दोन वेळा एचआयव्ही चाचणी करून घेतली मात्र पहिल्यावेळी ती रिपोर्ट आणण्यासाठी गेलीच नाही आणि दुसऱ्या वेळी तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजत आहे.