Aunt Nephew Wedding Viral : प्रेमासाठी काय पण हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल, मात्र काही लोक प्रत्यक्षात हे वाक्य खऱ्या अर्थाने जगताना दिसतात. एखाद्याच्या प्रेमात ते इतके वेडे होतात की, त्यांना प्रतिष्ठा, नाती काहीच महत्वाचे वाटत नाही. प्रेमासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. यामुळे नातेसंबंधांना कलंकित करणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशाचप्रकारे बिहारमधील जुमई जिल्ह्यातील एका महिलेचा पुतण्यावर जीव जडला, यामुळे तिने पती आणि तीन वर्षांच्या चिमुकलीला सोडून त्याच्याबरोबर लग्न केलं. एका मंदिरात जाऊन दोघांनी लग्नगाठ बांधली.
समोर आलेल्या माहितीनुसार, आयुषी कुमारी असं या महिलेचे नाव आहे, ती पाटणामधील रहिवासी आहे. तिचे काही वर्षांपूर्वी सिकेरिया गावातील विशाल दुबे नामक पुरुषाबरोबर लग्न झाले होते. या दोघांना लग्नानंतर एक तीन वर्षांची मुलगी आहे. मात्र मागील वर्षभरापासून तिचे पुतण्या सचिनबरोबर प्रेमप्रकरण सुरु झाले. शेजारीत राहत असल्याने आयुषी आणि सचिन यांच्यात जवळीक वाढत गेली, दोघं सतत एकमेकांशी मोबाईलवरुन बोलत होते. यामुळे दोघांमध्ये अनैतिक नातं अधिक घट्ट होत गेलं.
आयुषी आणि पुतण्यातील प्रेमसंबंध तिच्या पतीला माहित पडले. या नात्यास त्याने तीव्र विरोध केला. ज्यावरुन घरात अनेकदा वादही झाले, पती विशालने पत्नी आयुषीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर प्रकरण थेट जाऊन कोर्टात पोहोचले. पतीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. मात्र त्याआधीच आयुषी तिच्या प्रियकर पुतण्याबरोबर फरार झाली.
घरातून पळाल्यानंतर आयुषी तिच्या प्रियकर पुतण्या सचिनसह पाच दिवसांनी गावात आली, यानंतर गावातील मंदिरात त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर आयुषीने सांगितले की, पती विशाल सतत छळ करत असल्याने मी नवा जोडीदार म्हणून सचिनची निवड केली, माझी मुलगी आधीचा पती विशालबरोबर राहील, मी सचिनबरोबर राहीन. दरम्यान सचिननेही आयुषीच्या प्रेमाचा स्वीकार करत हे लग्न करुन खूश असल्याचे सांगितले.
तर आयुषीचा दुसरा पती विशालने पूर्व पत्नी आयुषीच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगितले की, आयुषीबरोबरच्या नात्याबाबत आता माझं काही देणं घेणं नाही, तिला जिथे, जसं राहायचं असेल तसं ती राहू शकते. पण मी आता तिचा पुन्हा स्वीकार करणार नाही.