ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट डेव्हिड वॉर्नर याचं डान्स आणि टॉलिवूड प्रेम कोणापासूनही लपलेलं नाही. करोना महासाथीदरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये त्यानं टॉलिवूडची गाणी आणि चित्रपटांच्या संवादांचे अनेक व्हिडीओ शेअर केले होते. टॉलिवूडच्या गाण्यावर अनेकदा त्यानं आपली पत्नी आणि मुलींसह व्हिडीओ तयार केले आहे. डेव्हि़ड वॉर्नरनं पुन्हा एकदा एक ‘बूटा बोमा’ या गाण्यावरचा आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
डेव्हिड वॉर्नर हा सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहे. अनेकदा तो आपले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता पुन्हा एकदा त्यानं ‘बूटा बोमा’ या टॉलिवूडमधील अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील गाण्यावर केलेला डान्स शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी थिरकताना दिसत आहे. त्याच्या मुलीचाही भन्नाट डान्स सर्वांना आवडत आहे. डेव्हिड वॉर्नरच्या अनेक फॉलोअर्सनं त्याचा हा व्हिडीओ लाईक आणि शेअरदेखील केला आहे.
अनेक युझर्सनं त्याचा डान्स आवडल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे टॉलिवूडचं गाणं आणि डेव्हिड वॉर्नर हे कॉम्बिनेशन भन्नाट असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वीही त्यानं अल्लू अर्जुनच्या जागी आपला चेहरा मॉर्फ केलेलं हे गाणं शेअर केलं होतं. वॉर्नरनं या गाण्यात आपला चेहरा मॉर्फ करून पूजा हेगडेसोबत डान्स केला होता. डेव्हिड वॉर्नर हा आयएपीलमध्ये हैदराबाद सनरायझर्स या संघाचा कर्णधार आहे. दरम्यान, आता भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौराही सुरू होणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय, तीन टी-२० सामने होणार आहेत. त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत चार कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत.
