Viral Video Mumbai Driver Hindi-Marathi Language Hack Winning Hearts : आपण इतर देशांत गेल्यावर तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. गरज पडल्यास विविध टूल्सची मदत घेऊन ती भाषा समजून घेतो आणि समोरच्याशी त्याच भाषेत संवाद साधतो. मग महाराष्ट्रात मराठी बोलावी, अशी विनंती किंवा आग्रह करणे चुकीचे कसे शकते? तर याच पार्श्वभूमीवर अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा मराठी शिकण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यादरम्यान काही जण मराठी शिकण्याचा, अगदी तोडकं-मोडकं मराठी बोलण्याचा तर अनेक जण अगदी अरेरावी करतानाही दिसत आहेत.
पण, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक रिक्षा चालक मात्र अगदी मनापासून मराठी शिकण्याची तयारी करताना दिसतो आहे. चालकाने त्याच्या सीटच्या अगदी वर एक कागद लटकवून ठेवला आहे. प्रवासादरम्यान प्रवासी आणि चालकाबरोबर होणाऱ्या संवादात म्हंटली जाणारी वाक्ये, काही शब्द हिंदीमध्ये आणि त्याचा मराठीमध्ये पुढे अर्थ सुद्धा लिहून ठेवला आहे. जेणेकरून रिक्षा चालकाला कोणत्या वाक्याला कसं उत्तर द्यावं हे लक्षात राहील आणि तो पटकन मराठीमध्ये उत्तर देऊ शकेल.
असं म्हणतात ना एखादी गोष्ट जेव्हा जोरजबरदस्तीने नव्हे, तर आपुलकीने आणि मनापासून स्वीकारली जाते, तेव्हाच त्या गोष्टीचे खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखे वाटते. त्यामुळे रिक्षा चालकाच्या या कृतीने सुद्धा असेच काहीसे दर्शवले आहे. मराठी शिकण्याची त्याच्या तयारीचे हे अनोखं पहिलं पाऊल खूपच कौतुकास्पद होते. त्यामुळे अशा मराठी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी आपण सगळ्यांनी थोडीशी तरी माणुसकी नक्कीच दाखवली पाहिजे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @neetupramodsingh08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आपण सगळेच आपापल्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असतो. त्यामुळे जेव्हा तुमच्यासमोर चुकीचं किंवा बरोबर ठरवण्याचा किंवा समोरच्याशी प्रेमाने, समजुतीने वागण्याचा पर्याय असेल, तेव्हा तुम्ही माणुसकी नक्कीच निवडली पाहिजे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा ‘त्यांनी आधीच आयुष्यात खूप काही सहन केलं आहे आणि आता भाषेची अडचणही त्यांच्या समोर उभी आहे. तरीही ते हार मानत नाहीत, सतत प्रयत्न करत आहेत… आणि हे सगळं फक्त आपल्या कुटुंबासाठी’, ‘या कष्टाळू लोकांशिवाय मुंबई काहीच नाही’, ‘आई सरस्वतीच्या कृपेशिवाय आई लक्ष्मीची प्राप्ती होत नाही. म्हणजेच, ज्ञान आणि शिक्षणाशिवाय धन, यश आणि समृद्धी मिळवणे कठीण आहे’, ‘नेहमी सामान्य माणसालाच सहन करावे लागते’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.
