मुंबईसारख्या मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात महिलांची सुरक्षितता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. रोज हजारो महिला रिक्षा, बस, ट्रेनने प्रवास करतात. पण, कधी कधी साधा प्रवासही भीतीदायक ठरतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील बांद्रा परिसरातून समोर आला असून, दोन तरुणींच्या रिक्षा प्रवासादरम्यान झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.
हा व्हिडीओ बांद्रा येथील एका गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या घटनेचा आहे. दोन मैत्रिणी रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाचालकासोबत त्यांचा वाद झाला. अर्ध्या रस्त्यातच रिक्षाचालकाने त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे मागितले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तरुणींनी मोबाईलमध्ये शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये सांगताना तरुणीने सांगितले की, ती आणि तिची मैत्रीण रिक्षात बसून आपसात बोलत असतात. त्या हसत-खेळत गप्पा मारत असताना रिक्षाचालक त्यांना “हळू बोला” असं सांगतो. यावर तरुणी थोड्या आश्चर्याने उत्तर देतात की त्या आपसातच बोलत आहेत, तुम्हाला नेमका काय त्रास होतो आहे. याच गोष्टीवरून वादाला सुरुवात होते.
पाहा व्हिडीओ
रिक्षाचालक चिडून रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबवतो आणि इथंच उतरा असं सांगतो. अजून गंतव्यस्थानी पोहोचायचं बाकी असतानाच तो पैसे मागू लागतो. तरुणी स्पष्टपणे सांगतात की पूर्ण प्रवास न झाल्याने त्या पैसे देणार नाहीत. यावर रिक्षाचालक अधिक आक्रमक होतो. तो धमकी देतो की “इथून निघून जा, नाहीतर मी फोन करून लोकांना बोलावतो मारायला.”
हा सगळा प्रकार आजूबाजूला लोक असतानाच घडतो, मात्र कोणीही मध्ये पडताना दिसत नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी रिक्षाचालकाच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. “हे फारच चुकीचं आहे”, “महिलांशी असं वागणं अजिबात चालणार नाही”, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही लोकांनी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
