Bangladeshis vandalise and loot Bata KFC outlets Video Goes Viral : बांगलादेशात सोमवारी इस्त्रायलविरोधात निदर्शने करण्यात आली, यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या जमावाने देशातील अनेक भागात बाटा आणि केएफसी आउटलेट्ससह अनेक दुकानांचे नुकसान केल्याचे पाहायला मिळाले. या हिंसाचारानंतर पोलिसांनी किमान ४९ जणांना याप्रकरणी अटक केली आहे, असे वृत्त ढाका ट्रिब्युनने दिले आहे.

यावेळी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हे आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये बोगरा, सिल्हेट, कॉक्स बाजार आणि चित्तगाँग या शहरांचा समावेश होता. इस्त्रायली सैन्याकडून गाझामध्ये पॅलेस्टिनींना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या विरोधात या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमले होते. इस्रायलशी संबंध असल्याचा समजातून लोकांनी काही व्यवसायांना लक्ष्य केले. यादर्मयान मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान करण्यात आले. काही भागांमध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांनी रस्ते देखील रोखून धरले असेही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान या हिंसाचाराचे अनेक व्हिडाओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हिंसक झालेला जमाव बाटा फुटवेअर शोरूमची तोडफोड आणि लूट करताना दिसत आहे. अनेक पुरुष काचेच्या भिंची दगडाने फोडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जमाव केएफसीच्या आउटलेटबाहेर निषेध करताना आणि त्याचे नुकसान करताना दिसून आला.

बांगलादेशात झालेल्या या तोडफोडीच्या घटनेवर अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तान प्रमाणेच हा देश देखील नियंत्रणाच्या बाहेर जाईल असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. तर दुसर्‍या एका वापरकर्त्याने दुसर्‍या देशाचा निषेध नोंदवण्यासाठी स्वत:च्या देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचवणे हे तर्कविसंगत आहे. बाटाची स्थापना चेक प्रजासत्ताकमध्ये झाली होती, अनेक दशकांपासून याचे भारताशी नाते राहिले आहे आणि ते (बाटा) इस्रायली देखील नाही. हे काही आंदोलन नाही. ही संतापाच्या रुपात दडलेली दिशाहीन अराजकता आहे, असे म्हटले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस आंदोलानचे व्हिडिओ फुटेज वापरून तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवत आहेत.