नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्येला समोर जावे लागत आहेत अशात दिल्लीमध्ये राहणा-या एका व्यक्तीला बँकेने २० हजार रुपयांच्या बदल्यात १० रुपयांची नाणी देऊ केली आणि या नाण्यांचे वजनच जवळपास १५ किलो भरले.

दिल्लीमध्ये राहणारे इम्तियाज आलाम यांना पैशांची नितांत गरज होती. पण बँकेतून फक्त २००० रुपये काढण्याचा नियम होता त्यामुळे त्यांना पैशांची व्यवस्था करण्यास अडचण येत होती. अखेर बँकेच्या मॅनेजरला विनंती करून त्यांनी २० हजार रुपये बदलून घेतले. त्यांना तातडीने या पैशांची गरज होती त्यामुळे त्यांचे कारण लक्षात घेता बँकेने त्यांना पैसे देण्याचे कबुल केले. पण २० हजार रुपये बदलून देण्याएवढे पैसे बँकेकडे नसल्याने त्यांनी इम्तियाज यांना १० रुपयांची नाणी देण्यात येईल असे सांगितले. शेवटी नाईलाजाने २० हजारांच्या बदल्यात १० रुपयांची नाणी स्विकारण्याचे इम्तियाज यांनी मान्य केले. पण या नाण्यांचे वजन जवळपास १५ किलो भरले त्यामुळे ही नाणी घेऊन घरी जाईपर्यंत इम्तियाज यांच्या नाकी नऊ आले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पैसे बदलून घेण्यासाठी ते ४ तास बँकेच्या रांगेत उभे होते.

वाचा : बँका आणि एटीएमध्ये रांगा लावण्यासाठी ‘येथे’ माणसे भाड्याने मिळतात

काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिले सोबत असाच प्रकार घडला. उत्तरप्रदेशमधील मोहनलाल गंज येथील बँकेने या वृद्ध महिलेला पैसे नसल्याने एक एक रुपयांची चिल्लर दिली होती. साठ वर्षांच्या सरजूदेवी यांचा मुलगा कॅन्सरमुळे रुग्णालयात भरती होता. त्याच्या औषधपाण्यासाठी सरजूदेवीला पैशांची गरज होती. तेव्हा जून्या नोटा बदलून घेण्यासाठी सरजूदेवी तासन् तास रांगेत उभ्या राहिल्या. त्यांचा नंबर आला तेव्हा सुटे पैसे नसल्याचे कारण सांगत कॅशिअरने त्यांना १ रुपयांची दोन हजार नाणी दिली. पण रुग्णालयाने नाणी मोजण्यास वेळ नसल्याचे सांगत हे पैसे स्विकारण्यास नकार दिला अखेर २ हजार नाण्यांची १७ किलो वजनांची पिशवी घेऊन लोकांकडे पैशांसाठी मदत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर १००० आणि ५०० च्या जून्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. या नोटा बदलून घेण्यासाठी अनेकांनी बँकेबाहेर रांगा लावल्या आहेत. या निर्णयानंतर ५०० आणि २ हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या पण बँकेने मात्र नागरिकांना पैशांचा तुटवडा असल्याने चिल्लर किंवा १०, २० आणि १०० च्या नोटांवर समाधान मानण्याची विनंती केली होती.

वाचा : ‘त्या’ बँक कर्मचाऱ्याची ह्दयस्पर्शी टिपण्णी सोशल मीडियावर व्हायरल