भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची पत्नी डोना गांगुलीने तिच्या नावे असलेल्या फेक फेसबुक पेजप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डोना गांगुली यांच्या नावाने असलेल्या फेक फेसबुक पेजवरुन सौरव गांगुली, डोना गांगुली आणि त्यांची मुलगी सना गांगुली यांचे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.

प्रसिद्ध नृत्यांगणा असलेल्या डोनाला तिच्या एका विद्यार्थ्याने फेक फेसबुक पेजबाबत सांगितलं, त्यानंतर डोनाने पोलिसांकडे तक्रार केली. “हो माझा आणि दादाचा (सौरव गांगुली) फोटो वापरुन फेसबुकवर एक पेज बनवण्यात आलं आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने मला याबाबत माहिती दिली. आम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे”, अशी माहिती डोना गांगुलीने पीटीआयसोबत बोलताना दिली. “माझा किंवा दादाचा फोटो वापरल्याने मला काही फरक पडला नसता. पण अनेकदा ही लोकं टिप्पणी करतात आणि नागरिकांना ते आमचं मत वाटतं व गैरसमज होतात…असं काही होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पोलिस हे फेक अकाउंट बंद करण्यात माझी मदत करतील अशी अपेक्षा आहे” असंही डोनाने म्हटलं. तसेच, “माझ्या खऱ्या फेसबुक अकाउंटवर खूप कमी फॉलोअर्स आहेत, पण फेक अकाउंटला 70 हजारपेक्षा जास्त युजर्स फॉलो करत आहेत”, असं डोना यांनी सांगितलं.

तर, याप्रकरणी बुधवारी एका पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. “आम्ही तपासाला सुरूवात केली असून फेक अकाउंट बनवण्यासाठी वापरलेला आयपी अॅड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल) ट्रॅक केला जात आहे. दोषी व्यक्तीला लवकरच ताब्यात घेतलं जाईल”, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.