Model Loses Tooth on Stage During Ramp Walk Viral Video: सौंदर्य स्पर्धा म्हटलं की परिपूर्णतेचा उच्चांक गाठण्याची अपेक्षा असते. प्रत्येक हालचाल, प्रत्येक हावभाव आणि प्रत्येक क्षण परफेक्ट असावा अशीच अपेक्षा प्रेक्षकांची असते. पण, कधी कधी मंचावर असे अनपेक्षित प्रसंग घडतात जे सगळ्यांना चकित करून टाकतात. असाच एक क्षण अलीकडे एका ब्यूटी पेजंटमध्ये पाहायला मिळाला… आणि काही सेकंदांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

मिस ग्रँड थायलंड सौंदर्य स्पर्धेतील हे दृश्य आहे. २५ मार्च रोजी रॅम्प वॉकचा पहिला राऊंड सुरू होता. स्पर्धक आपापली ओळख देत मंचावरून चालत होत्या. त्याच वेळी एक स्पर्धक आत्मविश्वासाने पुढे येते… चमकदार गाऊनमध्ये, चेहऱ्यावर स्मितहास्य… सगळं अगदी परफेक्ट! पण अचानक काहीतरी घडतं, ज्यामुळे काही क्षणांसाठी सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे खिळून राहतं.

कमोलवान चनागो नावाची ही स्पर्धक स्वतःची ओळख करून देत असताना तिच्या तोंडातून नकली दात (डेंचर) बाहेर सरकतात! हा क्षण कोणालाही गोंधळून टाकणारा असू शकतो. अनेक जण अशा वेळी घाबरले असते, मंचावरून खाली उतरले असते… पण इथेच घडतं काहीतरी वेगळं!

क्षणाचाही विलंब न करता, त्या स्पर्धकाने शांतपणे परिस्थिती हाताळली. तिनं प्रेक्षकांकडून थोडं वळून अत्यंत सहजतेने आपले दात नीट बसवले… आणि जणू काही घडलंच नाही, अशा आत्मविश्वासाने पुन्हा आपला रॅम्प वॉक आणि इंट्रोडक्शन सुरू केलं! तिच्या चेहऱ्यावर तसूभरही घाबरलेपण नव्हतं, उलट ती आधीसारखीच आत्मविश्वासाने झळकत होती.

हा सगळा प्रकार पाहून प्रेक्षक काही क्षणांसाठी थक्क झाले, पण लगेचच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं. तिच्या या धाडसाला आणि प्रसंगावधानाला लोकांनी भरभरून दाद दिली, अनेकांनी उभं राहून तिचं कौतुक केलं.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. काहींनी या प्रसंगावर टीका केली, पण बहुसंख्य लोकांनी तिच्या आत्मविश्वासाचं आणि प्रसंग हाताळण्याच्या शैलीचं कौतुक केलं. “खरी सुंदरता म्हणजे परिपूर्णता नव्हे, तर कठीण क्षणी स्वतःला कसं सावरतो यात असते,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

आजच्या काळात, जिथे प्रत्येक गोष्ट परफेक्ट दिसण्याचा दबाव असतो, तिथे या स्पर्धकाने दिलेला संदेश वेगळाच आहे. छोट्या चुका किंवा अपघात घडू शकतात, पण त्यातून स्वतःला सावरून पुढे जाणं हीच खरी ताकद आहे.

येथे पाहा व्हिडीओ

टीप : ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित असून, त्याची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.