scorecardresearch

एका लग्नाची अनोखी कहाणी; गुगल मीटद्वारे सहभागी होणार पाहुणे, झोमॅटोद्वारे घरपोच जेवणाची डिलिव्हरी

कोविडच्या नियमांचे उल्लंघन न करता अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

(फोटो क्रेडीट – अदिती दास/ फेसबुक)

भारतीय पद्धतीने लग्न करणे हा थाटामाटात आणि कुटुंबिय, पाहुणे, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत होणारा सोहळा समजला जातो. मात्र करोना निर्बंधामुळे लग्नसोहळ्याचे रुपांतर एका घरगुती कौटुंबिक कार्यक्रमात झाले आहे. त्यामुळे ज्यांनी थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न पाहिली आहेत, त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळाली आहेत. पण सध्या सोशल मीडियावर पश्चिम बंगालमधील एका जोडप्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या या लग्नासाठी फक्त ५० किंवा १०० नव्हे तर तब्बल ४५० लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी करोनाच्या सर्व नियमांचेही पालन केले जाणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून देशासह संपूर्ण जगावर करोनाचे संकट पाहायला मिळत आहे. भारतात करोनाच्या दोन लाटेनंतर पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी परत एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे. याच परिस्थितीत पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने कोविडच्या नियमांचे उल्लंघन न करता अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाला तब्बल ४५० पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यासाठी या जोडप्याने एक भन्नाट युक्तीही शोधून काढली आहे.

तब्बल ४५० लोकांच्या उपस्थितीत विवाह

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात येत्या २४ जानेवारीला संदीपन सरकार आणि अदिती दास हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नात ५० किंवा १०० नव्हे तर तब्बल ४५० लोक असणार आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, करोना काळात इतक्या लोकांमध्ये विवाह करणं कसं शक्य आहे. जर त्यांनी अशापद्धतीने विवाह केला तर त्यांना दंडही होऊ शकतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने पाहुण्यांना बोलावण्याचा विचार त्यांना महागात पडू शकतो.

झोमॅटोकडून घरपोच जेवण

पण या जोडप्याने यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या युक्तीनुसार त्यांच्या लग्नसोहळ्यात बहुतांश पाहुणे हे गुगल मीटचा वापर करुन सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे लग्नाचे विधी झाल्यानंतर या सर्व पाहुण्यांसाठी स्वादिष्ट भोजनव्यवस्थाही करण्यात आली आहे. या लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी झोमॅटोकडून घरपोच जेवण दिले जाणार आहे.

या युक्तीबाबत बोलताना संदिपन सरकार म्हणाले की, मी आणि अदिती गेल्या वर्षभरापासून लग्न करण्याचा विचार करत आहोत. पण करोनाचे रुग्ण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही अशाप्रकारे वर्च्युअल लग्नाची कल्पना दोन्हीही कुटुंबापुढे मांडली. खरतर ही कल्पना मी कोव्हिडग्रस्त झाल्यापासून डोक्यात होती. करोनाची लागण झाल्याने चार दिवस मी रुग्णालयात होतो. तेव्हाच ही युक्ती सुचली, असे त्यांनी सांगितले.

संदिपन आणि अदितीच्या प्रत्यक्ष लग्नात १०० लोक उपस्थित राहणार आहेत. तर तब्बल ३५० लोक गुगल मीटद्वारे लाईव्ह या सोहळ्यात सहभागी होतील. याबाबत संबंधित पाहुण्यांना एक दिवस आधी गुगल मीटची लिंक आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर त्यांना यात सहभागी होता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bengal couple invites guests for the wedding on google meet and food will be delivered via zomato nrp