कोलकात्यामधील जाधवपूर विद्यापिठातील एका विद्यार्थ्याला फेसबुकमध्ये नोकरी लागली असून वर्षाकाठी त्याला एक कोटी ८० लाखांचं वेतन देण्यात येणार आहे. या विद्यापिठातील कोणत्याही विद्यार्थ्याला आतापर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं सॅलरी पॅकेज ठरलं आहे.

बिशेक मोंडल असं या तरुणाचं नाव असून त्याला यापूर्वी गुगल आणि अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यांमकडूनही नोकरीच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र फेसबुकने त्याला या तिन्ही कंपन्यांपैकी सर्वाधिक वेतन देऊ केल्याने त्याने फेसबुकची निवड केली. “मी सप्टेंबरपासून फेसबुकमध्ये कामाला रुजू होणार आहे. ही नोकरी स्वीकारण्याआधी मला गुगल आणि अ‍ॅमेझॉनकडूनही नोकरीची ऑफर आलेली. मी फेसबुकची निवड केली कारण त्यांनी मला अधिक चांगलं वेतन देऊ केलं,” असं चौथ्या वर्षाला असणार बिशेकने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. तो कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत असून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्याला ही नोकरी लागलीय.

“मंगळवारी रात्री मला कंपनीकडून ऑफर आली. मागील दोन वर्षांमध्ये करोना काळात मला अनेक कंपन्यांमध्ये इंटरर्नशीप करण्याची संधी मिळाली. या काळात मी बरंच काही शिकलो. याचा मला मुलाखतीदरम्यान फायदा झाला,” असं बिकेशने इंडियन एक्सप्रेशशी बोलताना सांगितलं. बिकेश हा एका सर्वसामान्य मध्यवर्गीय घरातील मुलगा आहे. त्यांची आई शिबानी या अंगणवाडी सेविका आहेत. “ही एका आईसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे,” असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आपला मुलगा कायमच अभ्यास हुशार राहिला आहे असंही त्या सांगायला विसारल्या नाही.

करोनाच्या लाटेनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे विद्यापिठातील विद्यार्थ्याला एवढ्या मोठ्या वेतनाची ऑफर मिळालीय, असं विद्यापिठाच्या प्लेसमेंट ऑफिसर असणाऱ्या स्मिता भट्टाचार्या यांनी सांगितलं. मागील वर्षी या विद्यापिठातील नऊ विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांकडून वार्षिक एक कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं होतं.