Bengaluru Ambulance Stunt Viral Video : बंगळुरू शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे बाईकस्वारांच्या एका टोळक्याने एका रुग्णवाहिकेचा (एम्ब्युलन्स) रस्ता रोखला आणि गजबजलेल्या रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी केली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेत एक अत्यंत गंभीर रुग्ण मृत्यूशी झुंज देत होता.
शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ही घटना पहाटे साधारण २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोरागुंटेपाल्या ते यशवंतपूर या दरम्यानच्या भागात या हुल्लडबाज बाईकस्वारांनी रस्त्यावर मोठा गोंधळ घातला.
सायरन वाजूनही दिला नाही रस्ता
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि त्याला तातडीने उपचारांची गरज होती. रुग्णवाहिकेचा सायरन सतत वाजत होता, तरीही ५ ते ६ बाईकस्वारांनी संपूर्ण रस्ता अडवून धरला होता. त्यांनी रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी जागा दिली नाही आणि गाडीच्या पुढे-पुढे जात आपल्या दुचाकींवरून धोकादायक स्टंट करत राहिले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाईकस्वार रुग्णवाहिकेच्या पुढे जाऊन रस्ता कसा ब्लॉक करत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे बाईकवर मागे बसलेल्या कोणत्याही तरुणाने हेल्मेट घातलेले नव्हते. या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिकेच्या आतमध्ये हताश अवस्थेत झोपलेला गंभीर रुग्णही दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये प्रचंड संताप
या घटनेनंतर सोशल मीडियावरील युजर्सचा राग अनावर झाला आहे. नेटकऱ्यांनी या कृत्याचा माणुसकी मेलीय का? असा सवाल करत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आणीबाणीच्या सेवा (Emergency Services) रोखणे आणि कोणाचा तरी जीव धोक्यात घालणे हा गंभीर गुन्हा असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. बेंगळुरू पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे संबंधित बाईकस्वारांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
