Bengaluru Corporate Company Employee Support Compassionate Leave After Parent Demise: नोकरीच्या ठिकाणी पगार, प्रमोशन आणि करिअर ग्रोथ महत्त्वाची असतेच; पण आयुष्यातील कठीण प्रसंगी कंपनी आपल्या पाठीशी उभी राहते, हा विश्वास कर्मचाऱ्यासाठी त्याहून मोठा असतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेने याच संवेदनशील वर्क कल्चरची चर्चा पुन्हा सुरू केली आहे. बंगळुरूतील उद्योजक Vibin Babuurajan यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आपल्या बहिणीच्या कंपनीचे कौतुक करत एक अनुभव शेअर केला. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर कंपनीने त्यांच्या बहिणीला कामावर तातडीने परतण्याचा दबाव न आणता चार आठवड्यांहून अधिक काळाची सुट्टी दिली. एवढंच नाही, तर वडिलांच्या उपचारासाठी झालेल्या खर्चापैकी २० टक्के खर्चही कंपनीने उचलला, असा दावा त्यांनी केला आहे.

वडिलांच्या निधनानंतर दिला पुरेसा वेळ

Vibin यांच्या माहितीनुसार, त्यांच्या बहिणीने नुकतेच वडिलांना गमावले. अशा भावनिक आणि कठीण काळात कंपनीने तिला लगेच ऑफिसमध्ये रुजू होण्यास सांगितले नाही. उलट, कुटुंबासोबत राहता यावे आणि या दुःखातून सावरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तिला चार आठवड्यांपेक्षा जास्त काळाची रजा देण्यात आली. आज अनेक ठिकाणी सुट्टी घेण्यासाठीही कर्मचाऱ्यांना दबावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत इतक्या दीर्घ काळाची Bereavement Leave देण्याचा निर्णय सोशल मीडिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उपचारांचा २० टक्के खर्च कंपनीने केला

या घटनेतील आणखी एक बाब लक्ष वेधून घेणारी आहे. Vibin यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी झालेल्या खर्चापैकी २० टक्के रक्कम कंपनीने स्वतः भरली. कुटुंब आधीच भावनिक संकटातून जात असताना उपचारांचा आर्थिक भारही मोठा असतो. अशावेळी कंपनीने आर्थिक मदतीचा हात पुढे केल्याने कर्मचाऱ्याला मोठा आधार मिळू शकतो.

मात्र, Vibin यांनी कंपनीचे नाव सार्वजनिक केलेले नाही. त्यांच्या माहितीनुसार ही कोईम्बतूरमधून सुरू झालेली ५० वर्षांहून जुनी पारंपरिक कंपनी असून, ती ४० हून अधिक देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात करते.

चेअरमनने स्वतः मेसेज करून विचारली विचारपूस

कंपनीची संवेदनशीलता केवळ रजा आणि आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिली नाही. वडिलांच्या निधनानंतर कंपनीच्या चेअरमनने स्वतः त्यांच्या बहिणीला मेसेज करून तिची विचारपूस केली. मोठ्या कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडून आलेला असा वैयक्तिक संदेश दुःखाच्या काळात कर्मचाऱ्यासाठी भावनिक आधार ठरू शकतो. त्यामुळेच Vibin यांनी कंपनीच्या या कृतीचे विशेष कौतुक केले.

४ हजारांहून अधिक कर्मचारी, तरीही ‘माणुसकी’ कायम

Vibin यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीत ४ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. एवढ्या मोठ्या संस्थेतही एखाद्या कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक अडचणीची दखल घेतली जाणे आणि त्याच्या कुटुंबाला मदत करणे अनेकांना प्रेरणादायी वाटले. त्यांनी या घटनेचा संबंध जुन्या पिढीतील कौटुंबिक पद्धतीने चालणाऱ्या व्यवसायांशी जोडला. अशा व्यवसायांमध्ये कर्मचाऱ्यांना केवळ ‘एम्प्लॉयी’ न मानता कुटुंबाचा भाग समजले जात असे, असे त्यांनी नमूद केले. कदाचित त्यामुळेच पूर्वी अनेक कर्मचारी एकाच कंपनीसोबत वर्षानुवर्षे जोडलेले राहायचे.

सोशल मीडियावर कंपनीचे तोंडभरून कौतुक

Vibin यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केले. काही यूजर्सनी स्वतःचे कॉर्पोरेट अनुभव शेअर करत सांगितले की, काही कौटुंबिक व्यवसाय कर्मचाऱ्यांच्या कठीण काळात मोठ्या कंपन्यांपेक्षा अधिक चांगला आधार देतात. काहींनी जुन्या काळातील कर्मचारी-केंद्रित सुविधांचीही आठवण करून दिली. पेंशन, स्वस्त गेस्ट हाऊस आणि इतर सुविधा देणाऱ्या कंपन्यांचा उल्लेख करत आजच्या काळात आकर्षक ऑफिस आणि आधुनिक सुविधांसोबत नोकरीची सुरक्षितता आणि मानवी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

Vibin यांनी कंपनीचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे या दाव्याशी संबंधित इतर तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. मात्र, त्यांच्या पोस्टमुळे वर्क कल्चरवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण कंपनीकडून मिळणारा पगार, सुविधा आणि इतर फायदे एका बाजूला; पण कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगी त्याच्या भावनांचा आणि कुटुंबाचा विचार करणारी संवेदनशीलता वेगळीच असते. प्रामुख्याने महिलांसमोर असे बरेच प्रसंग आयुष्यात येतात जेव्हा त्यांना तारेवरची कसरत करत घर आणि नोकरी दोन्ही सांभाळावं लागतं. गरोदरपणाच्या काळात, आजारपणात किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणात अनेकदा भल्याभल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचा सल्ला देतात. किंवा काही तरी थातुरमातुर कारण सांगत राजीनामा द्यायला भाग पाडतात. अशावेळी मानसिकरित्या अस्थिर असलेल्या व्यक्तीला नोकरीची काळजी अधिक सतावते.

कर्मचाऱ्यासाठी पगार आणि करिअरची संधी महत्त्वाची असतेच; पण आयुष्याच्या अत्यंत कठीण प्रसंगी ‘कंपनी माझ्या पाठीशी उभी राहील’ हा विश्वास त्याहून मौल्यवान ठरतो. वडिलांच्या निधनानंतर चार आठवड्यांहून अधिक रजा, उपचारांच्या खर्चात २० टक्के मदत आणि चेअरमनने स्वतः मेसेज करून विचारलेली विचारपूस या सगळ्यामुळे ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

कंपनी कितीही मोठी असली, तरी कर्मचाऱ्यांसाठी माणुसकीची जागा कायम ठेवली तरच ‘वर्कप्लेस’ खर्‍या अर्थाने आपलं वाटतं, हेच या घटनेतून अधोरेखित होतं.