जवळपास मागील दोन महिन्यांपासून सुरु असेलेले आयपीएलचे सामने ३० मे रोजी संपले. यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल, तुमच्यापैकी अनेकांनी आयपीएलचा अंतिम सामन्यासह आधीचेही अनेक सामने पाहिले असतील यात शंका नाही. कारण आपल्या देशातील लोकांचे क्रिकेटवर किती प्रेम आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा सामना असला की अनेक लोक इतर कामं बाजूला ठेवतात पण क्रिकेट मॅच आवर्जून पाहतात.

आयपीएलचे सामने इतर सामन्यांपेक्षा मोठ्या आवडीने लोक पाहत असतात. पण आयपीएलचे सामने पाहणे म्हणजे आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचं बंगळुरूमधील उद्योजक तनय प्रताप यांनी म्हटलं आहे. प्रताप यांनी ट्विटर अकाऊंटवर नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) बद्दलचे मत व्यक्त केले आहे.

शिवाय त्यांनी आपले ट्विट त्या सर्व आयपीएल चाहत्यांना समर्पित केले आहे, जे एकही सामना पाहणं चुकवत नाहीत. तनय प्रताप यांनी म्हटलं आहे, “३० दिवस दररोज चार तास घालवणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील १२० मौल्यवान तास वाया घालवण्यासारखे आहे. या वेळेचा उपयोग नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी करता येऊ शकतो.” मात्र तनय प्रताप यांच्या मताशी अनेक क्रिकेटप्रेमी सहमत नसल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- प्रेयसीला प्रेमपत्र लिहिणं तरुणाला पडलं महागात; तब्बल १५ वर्ष चालला खटला, अखेर न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

तनय प्रताप यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “लोक नेहमी आपल्याकडे पुरेसा वेळ नसल्याची तक्रार करत असतात, तरीही ते तासन्तास आयपीएलचे सामने पाहत असतात, ते दररोज ४ तास म्हणजे महिन्यातील १२० तास वाया घालवतात. कल्पना करा जर हे सर्व तास त्यांनी नवीन कौशल्य शिकण्यात घालवले तर, तुम्ही तुमचा वेळ कशात गुंतवायचा ते तुम्हीच हुशारीने निवडा”

हेही पाहा- Video: उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, प्लास्टीकच्या पिशवीचा अनोखा वापर पाहून डोकंच धराल

तनय प्रताप यांच्या मतांशी अनेक नेटकरी असहमत असल्याचं दिसत आहे. कारण अनेकांनी आयुष्यातील प्रत्येक तास केवळ शिकण्यासाठी समर्पित केला जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे. शिवाय लोकांना आराम करण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी देखील थोडा वेळ हवा असतो अशा कमेंटही युजर्स करत आहेत. तनय प्रताप यांनी ट्विट करताच अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लोकांना थोडा आनंद घेऊ द्या. (मी आयपीएल पाहत नाही). आयुष्य नेहमीच समस्यांशी संबंधित असू शकत नाही, कौशल्ये शिकणे वगैरे इत्यादी नव्हे तर केवळ आनंदी राहणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय आहे.”

तर आणखी एकाने लिहिलं आहे, “प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने समोरच्या गोष्टीमधून आनंद मिळवत असतो किंवा काही शिकत असतो. समजा जर एखाद्याने संपूर्ण दिवस नवीन काही शिकण्यात घालवला आणि रात्री सामना पाहिला तर?” तर आणखी एकाने लिहिलं आहे, “लोकांनी रात्रंदिवस फक्त काही शिकतच बसावे का?” तर “आयपीएल पाहण्यामुळे आमचा दिवसभराचा थकवा निघून जातो असंही काही लोकांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनेक लोक प्रताप यांच्या मताशी असहमत असल्याचं पाहाला मिळत आहे. तर काहींनी त्यांचे समर्थन देखील केलं आहे.