Bengaluru Auto Driver Fight With Girls Video : बेंगळुरूच्या एचएसआर लेआउट सेक्टर ३ मध्ये सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. रिक्षाच्या भाड्यावरून दोन तरुणी आणि एका रिक्षाचालकामध्ये रस्त्यावरच जोरदार भांडण सुरू झाले, ज्याचे रूपांतर हळूहळू हाणामारीत झाले. या संपूर्ण घटनेचा स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला असून, तो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रस्त्यावर गोंधळ आणि मध्यस्थी

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी आणि रिक्षाचालक एकमेकांवर हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत. यावेळी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. तरुणींना रिक्षा चालक अगदी केसांना पकडून मारताना दिसतोय. यावेळी दोन तरुणी त्याचा प्रतिकार करताना दिसतायत. वाद हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिसऱ्या एका तरुणीने मध्यस्थी केली आणि तिघांना वेगळे करत भांडण शांत केले.

सोशल मीडियावर संताप आणि पोलिसांची कारवाई

इन्स्टाग्राम आणि X (ट्विटर) सह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युझर्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत बेंगळुरू पोलिसांकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एचएसआर लेआउट पोलिसांनी लगेचच हालचाल करत दोन्ही तरुणींशी संपर्क साधला आणि त्यांना तक्रार नोंदवण्यास सांगितले. मात्र, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तरुणींनी सध्या ठाण्यात येण्यास नकार दिला असून पोलिसांकडे १ ते २ दिवसांचा वेळ मागितला आहे.

दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप

दुसरीकडे, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेतला आहे. पोलीस चौकशीदरम्यान रिक्षाचालकाने दावा केला की, तरुणींनी त्याची रिक्षा भाड्याने घेतली होती, परंतु पोहोचल्यानंतर त्या भाडे देण्यावरून वाद घालू लागल्या. चालकाने असा गंभीर आरोप केला की, दोन्ही तरुणी दारूच्या नशेत होत्या. त्यांनी केवळ भाडे देण्यास नकार दिला नाही, तर शिवीगाळही केली. तरुणींनी आधी आपल्यावर हात उचलला आणि त्यानंतर स्वतःच्या संरक्षणासाठी आपण प्रत्युत्तर दिले, असा दावा रिक्षाचालकाने केला आहे.