Funny viral video: आजकाल लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी किंवा थोडं लक्ष वेधण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. अशातच बंगळुरूमधून समोर आलेला एक मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याच्या दंडापासून वाचण्यासाठी एका तरुणाने हेल्मेटऐवजी डोक्यावर चक्क कढई ठेवली आणि शांतपणे बाईकवर बसून प्रवास केला. हा विचित्र, पण भन्नाट जुगाड पाहून नेटिझन्सना हसू आवरत नाहीये.

हा व्हिडीओ रूपेना अग्रहारा परिसरातील असल्याचं सांगितलं जातं. व्हिडीओमध्ये एक तरुण बाईकच्या मागच्या सीटवर बसलेला दिसतो आणि त्याने डोक्यावर हेल्मेटऐवजी एक मोठी कढई ठेवलेली आहे. तो ती कढई अगदी काळजीपूर्वक बॅलन्स करताना दिसतो आणि ट्रॅफिकमध्ये हळूहळू पुढे सरकत असतो. पाहता पाहता हे दृश्य अनेकांना इतकं वेगळं वाटतं की तो व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने हे दृश्य ट्रॅफिकमध्ये मागून शूट केले असून, ते पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे.

हा व्हिडीओ ट्विटर वर ‘कर्नाटक पोर्टफोलिओ’ या अकाऊंटद्वारे शेअर केला. त्याला, फ्राईंग पॅन ऑम्लेट उलटवू शकते; पण कवटी नाही!— अशी मजेशीर कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पोस्ट होताच लोकांनी त्यावर तुफान प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी याला “सर्वोत्तम नाविन्य” म्हटलं. एका युजरने लिहिले, “जेव्हा जीवन चालान देतं, तेव्हा कढई घेऊन निघा!” अशा प्रतिक्रिया पाहून व्हिडीओ अजूनच व्हायरल झाला.

पण, काहींनी या घटनेवर नाराजीही व्यक्त केली. एका युजरने म्हटले, “लोकांना डोक्याच्या जखमेपेक्षा केस खराब होण्याची किंवा हेल्मेटवर पैसा खर्च करण्याची भीती जास्त वाटते.” आणखी एका व्यक्तीने हेल्मेटच्या प्रकारांबद्दल जागरूकता निर्माण करीत म्हटले की, बांधकामासाठी वापरले जाणारे हेल्मेट आणि रस्त्यावर वापरले जाणारे हेल्मेट यात मोठा फरक आहे.

पाहा व्हिडिओ

बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनीही या व्हिडीओकडे लक्ष दिले आहे. त्यांनी हा व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक सिटी ट्रॅफिक पोलिस ठाण्याकडे पाठवला असून, अशा प्रकारच्या जोखमीच्या कृतींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, हेल्मेट हे जीवरक्षक आहे; व्हायरल रीलसाठी नव्हे.”

या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, सोशल मीडियावर थोडे लक्ष वेधण्यासाठी अनेक जण आपले प्राण वाचवणारे उपकरण बाजूला ठेवतात. पण ट्रॅफिकमध्ये कढई डोक्यावर ठेवून प्रवास करणं हास्यास्पद असलं तरी त्यामागचा धोका प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे हेल्मेट घाला आणि सुरक्षित राहा – हा संदेश या व्हिडीओद्वारे अधोरेखित केला गेला आहे.