Bengaluru Rain Viral Video : मंगळवारी बंगळुरूमध्ये धो धो पाऊस कोसळला. काल शहरात सरासरी ४२.७ मिमी पाऊस पडला. काही तासांच्या पावसाने बंगळुरूच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढत अनेक लोकांना घरी जावे लागले. अक्षर: गुडघ्यापर्यंत रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. साचलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या स्थानिकांचे अनके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हिडीओमध्ये एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या एका बसमुळे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले दुचाकीस्वार थेट पाण्यात पडल्याची घटना एका व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

साचलेल्या पाण्यातून धावली बस, दुचाकीस्वार पडले पाण्यात


एक्स(पूर्वीचे ट्विटर) वर Anshul Garg@AnshulGarg1986 नावाच्या हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बंगळुरूमधील बीच रोडवरील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे. एका पुलाखालील रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलेले दिसत आहे. साचलेल्या पाण्यातून कारचालक अन् दुचाकी चालक वाट काढत आहे. अशात भरधाव वेगात एक बस त्याच रस्त्यावरून जाते. साचलेल्या पाण्यातून बस धावल्याने जोरात लाट आल्यासारखे पाणी बाजूला फेकले जात आहे. दरम्यान हे पाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या दुचाकी आणि कारवर उडत आहे. बसचा वेग इतका जोरात होता की, पाणी जोरात बाजूला फेकले गेली अन् दुचाकीस्वार अक्षरश: पाण्यात पडल्याचे दिसत आहे.

बंगळुरूमध्ये पुढील ४८ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस

१९ मे ते २० मे रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) बंगळुरू शहर स्थानकावर ३७.२ मिमी पाऊस पडला तर बंगळुरू HAL विमानतळ स्थानकावर ४६.५ मिमी पाऊस पडला. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत बंगळुरूमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यांसह गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. केएसएनएमडीसीने पुढील तीन दिवस कर्नाटकात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही जारी केला आहे.

कर्नाटकसाठी किनारीपट्टी लगत रेड अलर्ट

आयएमडीने कर्नाटकसाठी २० मे आणि २१ मे रोजी आणि २२ मे रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत किनारीपट्टी लगत रेड अलर्ट (२०४.५ मिमी पेक्षा जास्त अतिवृष्टी) जारी केला. आयएमडीने २१ मे रोजी जिल्ह्याच्या अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे आणि २२ मे रोजी पिवळा अलर्ट देखील जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना समुद्रात किंवा नदीत न जाण्याचे आवाहन

प्रतिकूल हवामानामुळे दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना २३ मे पर्यंत समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे. त्यांनी समुद्रातील मच्छिमारांना बंदरांवर परतण्यास सांगितले.दरम्यान, चिक्कमंगळुरू जिल्हा प्रशासनाने लोकांना नद्यांमध्ये जाऊ नये आणि सखल भागात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम

भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर, अनेक तंत्रज्ञान(आयटी) कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचा पर्याय दिला आहे. अनेकांना रोजच्या कामाच्या ठिकाणी जाताना सुरक्षेच्या समस्या उद्भवल्या आहेत.