भगवान हनुमानाला संकटविमोचक म्हटलं असलं तरी त्यांच्या मुर्तीमुळे मात्र बंगळूरू शहरातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. जगातील सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती कोलारवरून बंगळूरूमध्ये नेण्यात आली होती. ही प्रचंड मूर्ती वाहून नेताना रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय, रस्त्याच्या दुतर्फा असणारे विजेचा खांब कोसळले आहेत तर काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्सदेखील फुटल्या अल्याचं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. ६२ फूट उंच ७५० टन वजनाची हनुमंताची मूर्ती ३०० चाकांच्या गाडीवरून वाहून नेण्यात आली.

सोमवारी मूर्ती वाहून नेताना परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या मूर्तीसाठी १० कोटींचा खर्च आला. त्यातले साडेतीन कोटी हे केवळ कोलारमधून बंगळूरूपर्यंतच्या प्रवासासाठी राखून ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री ही मूर्ती हेन्नूर रोड परिसरातील रेल्वे पुलाखाली उडकली होती. मूर्तीची उंची जास्त असल्यानं ती पुलाखालून नेता येत नव्हती. मागे वळणंही शक्य नव्हतं. रात्री उशीपर्यंत या परिसारत गोंधळ होता. अखेर पुलाखालील रस्ता खोदून मूर्तीसाठी वाट करून देण्यात आली असल्याचं ‘न्यूज मिनिट’नं म्हटलं आहे. यामुळे शहाराच्या दिशेनं निघालेल्या लोकांना कित्येक तास वाहतूक कोंडी सहन करावी लागली.  एक किलोमीटर अंतर पार करायला तीन ते चार तास लागले अशीही तक्रार इथल्या नागरिकांनी केली. सोमवारी रात्रीपर्यंत शहरात वाहतूकीची कोंडी होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात निघालेल्या या बजरंगबलींच्या मूर्तीचा प्रवास लंकेवरल्या स्वारीइतकाच बिकट होता असं म्हणायला हरकत नाही.