हिंदी मालिकेतील गोपी बहू ही भूमिका कायम तिच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत राहिली आहे. असाच काहीसा प्रकार बंगळुरूत घडला आहे. पत्नीच्या विचित्र वागण्यामुळे पतीने कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. एका सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याने पत्नीच्या स्वच्छतेच्या वेडामुळे घटस्फोट मागितला आहे. पत्नीच्या टोकाच्या स्वच्छतेमुळे कंटाळल्याचं पतीने सांगितलं आहे. डिटर्जंट वापरून त्याचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन धुतल्याचं कारणही पुढे आलं आहे. हिंदी डेली सोपच्या कथानकासारखे वाटणारी ही स्क्रिप्ट प्रत्यक्षात सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याच्या निवासस्थानी झाली आहे. दुसरीकडे पत्नीही पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा विचार करत आहे.

पती पत्नी, दोघेही बेंगळुरूमधील रहिवासी आहेत, २००९ मध्ये लग्न झालं आहे. मोठ्या आयटीमध्ये काम करणाऱ्या पतीसोबत लग्नानंतर लगेचच पत्नी ऑन-साइट असाइनमेंटसाठी इंग्लंडला गेली. तिथे पत्नीने घर नीटनेटके ठेवले होते आणि त्यावर पतीही खूष होता. इथपर्यंत सर्वच व्यवस्थितपणे सुरु होतं. “दोन वर्षांनी त्यांच्या घरी बाळ जन्माला आल्यानंतर परिस्थिती बिघडू लागली. कामावरून परतल्यावर पत्नीला शूज, कपडे, मोबाईल साफ करण्यास पत्नी भाग पाडत होती. त्यामुळे पती नाराज झाला.”, असं बंगळुरू सिटी पोलीस वरिष्ठ काउंसल बीएस सरस्वती यांनी सांगितलं. या जोडप्याने इंग्लंडहून परतल्यानंतर कौटुंबिक समुपदेशन घेतले. त्यानंतर, परिस्थिती सुधारली आणि त्यांना दुसरा मुलगा झाला. तथापि, कोविड-19 साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर या जोडप्याचे वैवाहिक संबंध पुन्हा एकदा बिघडू लागले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कोविड आल्यानंतर महिलेने घरात असलेल्या सर्व गोष्टींची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात नवरा घरातून काम करत होता आणि पत्नीने लॅपटॉप आणि सेलफोनही धुतला होता. याहून धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या आजारी सासूच्या निधनानंतर, तिने पती आणि मुलांना ३० दिवस घराबाहेर ठेवले होते. कारण तिला ती जागा स्वच्छ करायची होती. ती दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा आंघोळ करते आणि आंघोळीचा साबण स्वच्छ करण्यासाठी वेगळा साबण वापरते, असा आरोपही पतीने केला आहे.

नवरा हवा की मटण?, शाकाहारी पतीचा पत्नीला प्रश्न; नेटकऱ्यांनी दिली मजेशीर उत्तरं

पत्नीच्या वागण्याला कंटाळून पती मुलांसह त्याच्या पालकांच्या घरी गेला आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलिसांचं दार ठोठावले. नोव्हेंबर महिन्यात तब्बल तीनवेळा समुपदेशन करण्यात आलं. मात्र ते निष्फळ ठरलं. पत्नीला ओसीडी असल्याचा संशय असल्याने तिच्यावर उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे पत्नीने तिचे वागणे सामान्य असल्याचे सांगितलं आहे. दुसरीकडे स्वच्छतेच्या सवयींचे असामान्य वर्णन केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध छळाची तक्रार दाखल करणार आहे.