Bangalore IT Girl Rejects Groom 2 lakh salary: लग्न ठरवताना आजच्या काळात आर्थिक सुरक्षितता आणि जोडीदाराचं उत्पन्न याकडं विशेष लक्ष दिलं जातं. मुलाचं उत्पन्न किती, फ्लॅट व इतर प्रॉपर्टी आहे का? कुटुंबात किती सदस्य आहेत, त्याच्या नोकरीचं किंवा व्यवसायाचं भविष्य काय? डोक्यावर ईएमआयचे हप्ते आहेत का? या सर्व गोष्टी मुलीच्या घरच्यांकडून पाहिल्या जातात. बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीने दरमहा २ लाख रुपये कमावणाऱ्या मुलाचा लग्नाचा प्रस्ताव थेट फेटाळून लावला आहे. लग्नाची बोलणी करत असताना मुलानं जी अट ठेवली, ती आपल्याला मान्य नसल्याचे सांगून या तरुणीनं लग्नास नकार दिला. याबद्दलची सविस्तर पोस्ट तिनं एक्सवर शेअर केली.

आईच्या आग्रहास्तव भेट, पण…

‘नंदिनी’ नामक तरुणीनं ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सविस्तर मांडला. नंदिनी आयटी क्षेत्रात कार्यरत असून तिचा मासिक पगार सुमारे ९० हजार रुपये आहे. सुरुवातीला लग्नासाठी फारशी उत्सुक नसतानाही आईच्या आग्रहाखातर तिनं संबंधित मुलाला भेटण्याचं मान्य केलं. तो तरुण दरमहा २ लाख रुपये कमवत होता. तो आपल्या आई-वडिलांबरोबर राहत असून कुटुंबातील आर्थिक जबाबदाऱ्या एकट्यावर होत्या; तर नंदिनी स्वतंत्र राहत असून तिच्यावर कोणतीही मोठी कौटुंबिक जबाबदारी नव्हती.

तू फेमिनिस्ट आहेस?

भेटीदरम्यान दोघांमध्ये झालेल्या संवादानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नंदिनीने सांगितल्यानुसार, त्या तरुणाने सुरुवातीला तिला विचारले, “तू फेमिनिस्ट आहेस, मग लग्नानंतर घरातील ५० टक्के खर्चाचा वाटा उचलणार का? नंदिनीने यावर होकार दिला. त्यानंतर त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारला, “मग नोकरी सोडून गृहिणी होणे पसंत आहे का?”

नंदिनीने यानंतर सांगितलं की, या दोन्हींपैकी ती काहीही करणार नाही. तिला स्वतःच्या पायावर उभं राहणं पसंत असल्याचं तिनं स्पष्ट सांगितलं. यावर त्या तरुणाने, “स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याची गरजच काय?” असा प्रतिप्रश्न केला.

“फ्रेंच फ्राईज खात सडेतोड उत्तर दिलं”

तरुणाच्या या प्रश्नावर कोणताही संताप व्यक्त न करता नंदिनीनं शांतपणे फ्रेंच फ्राईज खात त्याला उत्तर दिलं. तिनं विचारलं, “जर तुम्हाला परावलंबी पत्नी हवी असेल, तर स्वतःहून गृहिणी होऊ इच्छिणाऱ्या मुलीशी लग्न का करत नाही? एका नोकरी करणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या तरुणीला परावलंबी बनवण्याचा अट्टाहास कशासाठी?”

नंदिनीचे हे उत्तर ऐकून तो तरुण काही काळ निरुत्तर झाला. त्यानंतर त्यानं, “म्हणजे तू मला नकार देतेयस का?” अशी विचारणा केली. त्यावर नंदिनीने, “होय, तुला माझ्यापेक्षा अधिक चांगली मुलगी मिळू शकते; मला स्वतःच्या पायावर उभे राहायला आवडतं,” असं स्पष्ट सांगितलं.

त्यानंतर तिनं स्वतःच्या जेवणाचं बिल भरलं आणि ती निघून गेली. या घटनेनंतर तिची आई काही दिवस नाराज होती, मात्र आता परिस्थिती पूर्ववत झाल्याचं तिनं सांगितलं.

Bangalore IT Girl Rejects Groom 2 lakh salary
बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीने तिचा लग्नासंबंधीच्या बोलणीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

नेटकऱ्यांचा पाठिंबा आणि संमिश्र प्रतिक्रिया

नंदिनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं. “स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या स्त्रीनं आपली स्वप्नं आणि स्वावलंबन सोडण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली.

“जर मुलाला गृहिणी हवी असेल, तर त्यानं सुरुवातीपासूनच तशी अपेक्षा ठेवायला हवी. करिअर करणाऱ्या मुलीवर बंधनं लादणं चुकीचं आहे,” असं मत दुसऱ्या एका नेटकऱ्यानं मांडलं.