Chanakya Niti on Money Saving : आजकाल लोक इतरांना दाखवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च करू लागले आहेत. महागडे कपडे, चैनीच्या वस्तू आणि दिखाऊ जीवनशैली हे अनेकांच्या यशाचे मापदंड मानले जाते. पण, चाणक्य नीती काही वेगळेच सांगते. आचार्य चाणक्यांच्या मते, संपत्ती तेव्हाच टिकते जेव्हा एखादी व्यक्ती शहाणपणाने खर्च करायला शिकते. पण काही विशिष्ट गोष्टींवर अतिरिक्त खर्च केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यांना भविष्यासाठी पैसे वाचवायचे आहेत, त्यांनी या गोष्टी नक्कीच जाणून घेतल्या पाहिजेत…

समाजाची भीती

अनेकदा, लोक समाजाच्या भीतीमुळे गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. लग्न आणि समारंभांमध्ये दिखाव्यासाठी घेतलेली कर्जे दीर्घकाळात आर्थिक बोजा बनू शकतात. चाणक्याच्या मते, समाज केवळ सल्ला देतो. पण, कठीण काळात पाठीशी उभे राहत नाही. म्हणून, इतर काय विचार करतात यापेक्षा स्वतःच्या क्षमतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

स्वस्त लोकप्रियता

इतरांची वाहवा मिळवण्यासाठी किंवा स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी उगाच पैसे खर्च करणे योग्य नाही. चाणक्यांच्या मते, जो माणूस फक्त लोकांच्या गोड बोलण्याने आणि स्तुतीने आनंदी होतो, त्याचा शेवटी तोटाच होतो. खरा सन्मान आणि ओळख ही मेहनत, चांगले वागणे आणि गुणांमुळे मिळते; दिखावा करून किंवा पैसा खर्च करून नाही.

देखाव्यापासून दूर राहा

चाणक्य नीतीनुसार, केवळ इतरांना प्रभावित करण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणे योग्य नाही. अनेक लोक आपली सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी आपल्या ऐपतीपलीकडे खर्च करतात. अशी प्रतिष्ठा फार काळ टिकत नाही. लोक तुमची प्रत्यक्ष प्रशंसा करू शकतात. पण, प्रत्यक्षात कोणालाही त्याची पर्वा नसते. म्हणून, दिखावा करण्याऐवजी, तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

चुकीच्या लोकांवर खर्च करू नका

काही लोक केवळ फायद्यासाठी नाती जपतात. अशा लोकांवर पैसा आणि वेळ खर्च करणे हानिकारक मानले जाते. चाणक्य नीती सांगते की, स्वार्थी मित्र कठीण काळात तुम्हाला सोडून जातात. म्हणून, जे तुमचा आदर करत नाहीत किंवा तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात. त्यांच्यावर खर्च करणे टाळावे.

उत्तम भविष्याची तयारी

आचार्य चाणक्य यांच्या मते, काटकसर ही गरिबी नसून, उत्तम भविष्याची तयारी आहे. सुरुवातीला लोक तुमची चेष्टा करतील. पण, कालांतराने, तेच लोक तुमच्या यशाच्या कारणाबद्दल प्रश्न विचारतील.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)